पुणे ः प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) 14 मार्च रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त असून, एमपीएससीच्या या निर्णयाविरोधात पुण्यासह अन्य ठिकाणी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून राज्य सरकारचा निषेध नोंदविला. राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलत असल्याची अधिकृत माहिती एमपीएससीने गुरुवारी (दि. 11) परिपत्रकाद्वारे दिली. परीक्षेचे नवीन वेळापत्रक यथावकाश जाहीर करण्यात येणार असल्याचेदेखील पत्रकात म्हटले आहे, मात्र पूर्ण तयारी झालेली असताना अगदी तीन दिवस अगोदर परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा उद्रेक पुण्यात पहावयास मिळाला. पुण्यातील नवी पेठ येथे असंख्य विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि राज्य सरकारचा जोरदार घोषणाबाजी करून तीव्र निषेध केला. या वेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीही विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरून रास्ता रोको व ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला. ही परीक्षा न घेण्यामागे ठाकरे सरकारचे राजकारण काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत. त्यामुळे राज्य सेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने ती पुढे ढकलण्यात यावी, असे राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभागाकडून लोकसेवा आयोगाला कळवण्यात आले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. आता पुन्हा परीक्षा पुढे गेल्याने लाखो विद्यार्थ्यांना खूप त्रास होणार आहे. शिवाय करिअरचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, एमपीएससीच्या परीक्षांसाठी अभ्यास करणारे विद्यार्थी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपापल्या परीक्षा केंद्रांवर वेळेवर उपस्थित राहण्यासाठी पोहचले होते, मात्र आता ऐनवेळी परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. निवडणुका, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आणि इतर सर्व व्यवहार जर सुरळीत होऊ शकत असतील, तर राज्य सेवा पूर्व परीक्षा का होऊ शकत नाहीत, असा सवाल आता विद्यार्थी उपस्थित करू लागले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापुढे स्पर्धा परीक्षा पुढे ढकलल्या जाणार नाहीत. या तारखा आता अंतिम आहेत असे एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. तरीही आता पुन्हा एकदा राज्यसेवा परीक्षा स्थगित केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत असून, राज्य सरकार तरुणांबद्दल गंभीर असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
-महेश बडे, प्रतिनिधी, एमपीएससी स्टुडंट्स राईट्स
युवक काँग्रेसकडून महाविकास आघाडीला घरचा अहेर
एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याच्या राज्य सरकारच्या या निर्णयाचा युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी निषेध केला आहे. ‘एमपीएससीची परीक्षा अचानकपणे पुढे ढकलण्याचा जो निर्णय आज झाला आहे, त्याचा मी जाहीर निषेध करतो. कोरोनाचे संकट कितीही मोठे असले तरीही अशा पद्धतीने अचानकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे? या निर्णयावर तातडीने फेरविचार झालाच पाहिजे,’ असे ट्विट त्यांनी केले आहे.