Breaking News

जेएनपीटी बायपासवरील काँक्रीट रस्त्यावर बेकायदा पार्किंग

पनवेल : बातमीदार

महामार्गाच्या बाजूला शेवटच्या मार्गिकांवर अनेक ठिकाणी बेकायदा पार्किंग केल्याचे पाहायला मिळते, मात्र नव्याने रूंदीकरण करून काँक्रिटीकरण केलेल्या जेएनपीटी आम्रमार्गावरही महामार्गाच्या मधोमध पहिल्या मार्गिकेवर बेकायदा पार्किंग केली जात आहे. हाकेच्या अंतरावर असलेल्या कळंबोली वाहतूक शाखेकडून या वाहनांवर कोणतीही कारवाई केली जात नाही.

सायन-पनवेल महामार्ग, मुंब्रा-पनवेल, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि जेएनपीटीकडे जाणारा आम्रमार्ग आदी अनेक रस्त्यांना एकत्र आणणार्‍या कळंबोली सर्कल पनवेलमधील महत्त्वाचा चौक आहे. जेएनपीटी बंदराकडे जाणार्‍या देशाच्या कानाकोपर्‍यातून आलेली अवजड वाहने याच मार्गाने जेएनपीटीकडे जातात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कायम वर्दळीच्या असलेल्या जेएनपीटी आम्रमार्गाचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला. डी-पॉईंटकडे जाणार्‍या या रस्त्याचे रुंदीकरण पूर्णत्वास आले असून रुंदीकरणामुळे हा मार्ग आठपदरी झाला आहे. अतिशय प्रशस्त रस्त्यामुळे या मार्गावरील कोंडी आता सुटली आहे, मात्र जेएनपीटी आम्रमार्गावर रस्त्याच्या मधोमध अवजड वाहनांची बेकायदा पार्किंग होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. डी-पॉईंटकडून कळंबोली सर्कलकडे येणार्‍या मार्गावर हा बेकायदा पार्किंगचा प्रकार सुरू आहे. सुमारे एक किलोमीटरची ही वाहनांची मधोमध लागणारी रांग वाहतुकीस अडथळा ठरते आहे.

वाहतूक पोलीस हाकेच्या अंतरावर

कळंबोली सर्कलपासून सुरू होणारी ही महामार्गाच्या मधोमध असलेली रांग वाहतूक पोलिसांना दिसत नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कळंबोली वाहतूक शाखेचे कर्मचारी दिवसरात्र कळंबोली सर्कलवर तैनात असतात. सिग्नल तोडणारे, हेल्मेट न घालणार्‍यांवर कारवाई करीत असतात, मात्र महामार्गाच्या मधोमध असलेली ही वाहने त्यांना कधी दिसत नाहीत. दिवसरात्र ही वाहने उभीच असतात. वाहतूक पोलिसांचा आशीर्वाद असल्याशिवाय महामार्गाच्या मधोमध पार्किंग करण्याची कोणीही हिंमत करणार नाही, असा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे कळंबोली वाहतूक शाखेचे कार्यालयदेखील येथून हाकेच्या अंतरावरच आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply