Breaking News

पनवेलकरांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाचे ठरणार -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : वार्ताहर
पनवेलमधील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गर्दीच्या व महत्त्वाच्या ठिकाणी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने 44 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हे कॅमेरे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील, असे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले. पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 12) भेट देऊन त्यांनी सीसीटीव्ही कंट्रोल रूमची पाहणी केली. त्या वेळी ते बोलत होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत उमेश इनामदार, प्रकाश खैरे आदी उपस्थित होते. त्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी स्वागत केले.
या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना पनवेल शहर परिसरात गर्दीच्या ठिकाणी सद्यस्थितीत बसवण्यात आलेल्या 44 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची आणि त्यांचा कंट्रोल रूम पनवेल शहर पोलीस ठाण्यात नैमुद्दीन शेख (रिंटू) सीसीटीव्ही टेक्निशयन यांच्या माध्यमातून बसवण्यात आल्याची माहिती दिली. या कंट्रोल रूममध्ये आगामी काळात आधुनिक पद्धतीने स्पिकर यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्याद्वारे एखाद्या ठिकाणी गर्दी झाल्यास किंवा कोणती दुर्घटना घडल्यास या कंट्रोल रूममधूनच स्पिकरच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येईइ. हा प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथमच पनवेलमध्ये केला जाणार आहे.
शहरातील गर्दीची ठिकाणे बाजारपेठ, सराफ बाजार, मिरची गल्ली आदी ठिकाणच्या वाहतूक कोंडीसंदर्भातसुद्धा या वेळी चर्चा झाली व लवकरच वाहतूक अधिकार्‍यांची बैठक घेऊन आगामी सणासुदीच्या काळात शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पनवेल शहरात अजूनही जास्त सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची गरज असल्याने या संदर्भात आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासनदेखील आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply