राजिप सीईओंच्या आदेशान्वये बीडीओंची पनवेल पोलिसांत तक्रार
पनवेल ः रामप्रहर वृत्त
तालुक्यातील उसर्ली खुर्द ग्रामपंचायत हद्दीत इमारत बांधकामांना बोगस परवाना देऊन नागरिकांची फसवणूक आणि शासनाचा महसूल बुडविप्रकरणी माजी सरपंच विश्वास लक्ष्मण भगत आणि प्रमिला मोहन भगत यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे आदेश रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये यांना दिले आहेत. या संदर्भात श्री. भोये यांनी दिलेल्या निर्देशानुसार ग्रामसेवकाने माजी सरपंच विश्वास भगत आणि प्रमिला भगत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.
राज्य शासनाने पनवेल, उरण तालुक्यातील सुमारे 195 गावांमध्ये 10 जानेवारी 2013पासून नैना (सिडको) विकास प्राधिकरण लागू झाले आहे. या अंतर्गत उसर्ली खुर्द ग्रामपंचायत परिसरही येतो. नैना अस्तित्वात आल्यानंतर बांधकाम परवानगी देण्याचा अधिकार नैनाकडे आला. असे असताना माजी सरपंच विश्वास भगत यांनी बिल्डर्सशी संगनमत करून अंदाजे 70 ते 80 इमारतींना स्वतःच्या सही, शिक्क्याने नैना विकास प्राधिकरण येण्यापूर्वी म्हणजेच 10 जानेवारी पूर्वीच्या तारखा टाकून ग्रामपंचायतीचा बोगस इमारत बांधकाम परवाना दिला आहे. त्याआधारेच इमारतींचे बांधकाम पूर्ण होऊन नागरिक तेथे रहावयास आलेले आहेत, मात्र ही बांधकामे बेकायदेशीर असल्याने नैना प्राधिकरणाने ती बेकायदेशीर ठरवली आहेत.
या संदर्भात उसर्ली खुर्द ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीवरून जि. प. च्या सीईओंनी चौकशी केली असता त्यात तत्कालीन सरपंच विश्वास भगत दोषी आढळले. त्यामुळे सीईओंनी शासन निर्णयानुसार सरपंच विश्वास भगत यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पनवेलच्या गटविकास अधिकार्यांना दिले होते, मात्र त्यांनी कारवाईस टाळाटाळ केली. त्यामुळे ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यामुळे अखेर बीडीओंनी ग्रामसेवकामार्फत पनवेल शहर पोलीस ठाण्यात माजी सरपंच विश्वास भगत आणि प्रमिला भगत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
या कारवाईमुळे नैना परिसरातील बेकायदेशीर बांधकामे करणार्या अनेक बिल्डर्सना चाप बसणार आहे, तर नागरिकांची दिवसेंदिवस होणार्या फसवणुकीपासून सुटका होणार आहे.