विम्बल्डन ः वृत्तसंस्था
विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक निकालाची नोंद झाली. दोन आठवड्यांपूर्वीच फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणार्या ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासला पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच आणि बेलारूसची आर्यना सबालेंका यांनी मात्र संघर्षपूर्ण विजयासह दुसरी फेरी गाठली.
पुरुष एकेरीत अमेरिकेच्या बिगरमानांकित फ्रान्सेस टिआफोएने तिसर्या मानांकित त्सित्सिपासला 6-4, 6-4, 6-3 अशी सरळ तीन सेटमध्ये धूळ चारली. त्सित्सिपासने लाल मातीवरील फ्रेंच स्पर्धेच्या अंतिम फेरीत जोकोव्हिचला कडवी झुंज दिली होती, मात्र हिरवळीवर त्याला कमाल करता आली नाही. 2019मध्ये त्सित्सिपासला पहिल्याच लढतीत पराभव पत्करावा लागला होता. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी विम्बल्डन स्पर्धा रद्द करण्यात आलेली.
जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेल्या जोकोव्हिचने ब्रिटनच्या बिगरमानांकित जॅक ड्रॅपरला 4-6, 6-1, 6-2, 6-2 असे चार सेटमध्ये पिछाडीवरून नमवले. हा सामना दोन तास, चार मिनिटे रंगला. जोकोव्हिचने सलग तिसर्या ग्रँडस्लॅम सामन्यात पहिला सेट गमावूनही विजय मिळवला. फ्रेंच स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम फेरीतही त्याने अशी कामगिरी केली होती.
महिलांमध्ये दुसर्या मानांकित सबालेंकाने मोनिका निकोलेस्क्यूवर 6-1, 6-4 अशी मात करून दुसरी फेरी गाठली. स्पेनच्या 11व्या मानांकित गार्बिन मुगुरुझाने फिओना फेरोवर 6-0, 6-1 असे वर्चस्व गाजवले. ऑस्ट्रेलियाच्या चौथ्या मानांकित सोफिआ केनिनने वँग झिनयूवर 6-4, 6-2 अशी सरशी साधली.
Check Also
शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …