Breaking News

मालमत्ता कर भरणार्‍यांसाठी पनवेल पालिकेची प्रोत्साहनपर योजना

सहा लाखांच्या अपघात विमा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडणार

पनवेल ः रामप्रहर वृत्त

महापालिका प्रशासन मालमत्ता कर भरणार्‍यांना सहा लाखांचा अपघात विमा देण्याचे ठरवले आहे. तसा ठराव केला असून मंगळवारी (दि. 21) होणार्‍या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

पनवेल महापालिकेने शहरातील मालमत्ताधारकांच्या सुरक्षेसाठी दोन कोटी रुपये खर्च करून ही अपघात विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या विमा योजनेचा लाभ तीन लाख मालमत्ताधारक व त्यांचे कुटुंबीय अशा सुमारे 12 लाख नागरिकांना होणार आहे. विशेष म्हणजे जे मालमत्ताधारक कर भरतात त्या सर्वांना या योजनेचा मोफत लाभ उचलता येणार आहे. ही योजना लागू झाल्यानंतर मालमत्ताधारक पती, पत्नीचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसांना सहा लाखांचा विम्याचा लाभ मिळणार आहे.

संबंधित योजनेमध्ये कुटुंबाच्या व्याख्येमध्ये पती, पत्नी, 30 वर्षे वयांची दोन मुले (अविवाहित मुलीच्या वयाची मर्यादा नाही), आई वडील, अपंग मुले (अविवाहित) यांचा समावेश आहे.पालिका क्षेत्रात एकापेक्षा अधिक मालमत्ता असल्या तरीही एकच मालमत्ता गृहीत धरून लाभ दिला जाईल. मालमत्ताधारकांच्या दोन अपत्यांपैकी एकाचा किंवा पालकांचा अपघाती मृत्यू झाल्यास तीन लाख रुपयांची विम्याची रक्कम मिळेल.

आयुक्त गणेश देशमुख यांनी याबाबत सांगितले की, आपण जो मालमत्ता कर गोळा करतो, तो जनतेला सेवासुविधा उपलब्ध करण्यासाठी. अपघात विमा योजना हा त्याचाच एक भाग आहे. या योजनेचा नागरिकांवर कोणताही भार येणार नसून पालिका प्रशासन याचा प्रीमियम भरणार आहे. नागरिकांनी मालमत्ता कर भरावा म्हणून ही योजना नाही तर नागरिकांच्या कल्याणासाठी आहे.

या विमा योजनेमध्ये कुटुंबातील व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा अपघात झाल्यास कुटुंबातील सर्वांना मिळून किंवा एका व्यक्तीला एका वर्षांमध्ये दवाखान्यातील जास्तीत जास्त सव्वा लाख रुपयांचा वैद्यकीय खर्च मिळणार आहे. तातडीच्या वैद्यकीय खर्चात रुग्णवाहिकेचा वापर झाल्यास पाच हजार रुपये खर्च मिळू शकणार आहे. अपघातादरम्यान पूर्णत: कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 6 लाख रुपये संबंधित कुटुंबातील व्यक्तीला मिळू शकतील, मात्र लाभ मिळण्यासाठी मालमत्ताधारकांना थकीत मालमत्ता कर भरावा लागणार आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply