कर्जत : बातमीदार
येथील नगर परिषदेमध्ये काम केलेले तीन कर्मचारी विविध नगरपालिकांचे मुख्याधिकारी झाले आहेत. त्यात कर्जत तालुक्यातील दोन आणि कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्षाचा समावेश आहे. कर्जत तालुक्यातील नेरळ येथील मनोज पष्टे यांनी कर्जत नगर परिषदेमध्ये लेखापाल म्हणून काम केले आहे. त्यांनतर त्यांनी मुरबाड नगरपंचायत, बदलापूर नगर परिषदमध्येदेखील काम केले होते. ते खात्याअंतर्गत घेतलेल्या मुख्याधिकारी पदाची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. त्यांना मंचर (ता. जुन्नर, जि. पुणे) नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तालुक्यातील वारे गावाचे मनोज म्हसे यांनी कर्जत नंतर बदलापूर नगर परिषदेमध्ये काम केले आहे. त्यांची यावल (जि. जळगाव) नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. कर्जत नगर परिषदेचे लेखापाल आणि नगर परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद नातू यांची तुळजापूर (जि. उस्मानाबाद) नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे.