Breaking News

नेरळजवळ गोळीबार; रिक्षाचालक थोडक्यात बचावला, गुन्हा दाखल

कर्जत ः बातमीदार

बदलापूर येथून भाडे घेऊन कर्जतकडे येणार्‍या रिक्षाचालकावर नेरळजवळ गोळीबार करण्यात आल्याची घटना रविवारी (दि. 22) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमी रिक्षाचालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदानंद शिवाजी मुंढे (रा. सोनिवली. बदलापूर) असे गोळीबारात जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे नाव असून त्याला एका अनोळखी व्यक्तीने फोन करून पत्नीला कर्जतमध्ये एका महाराजांकडे जायचे आहे, असे सांगून रिक्षा बूक केली. रविवारी सायंकाळी सदानंद मुंढे भाड्यासाठी निघाले असताना अनोळखी व्यक्तीने आधी वांगणी आणि नंतर दामत येथे बोलावून घेतले. मग रिक्षा कर्जतकडे निघाली. वाटेत त्या अनोळखी व्यक्तीने मुंढे यांना पलीकडे असलेल्या बियर शॉपमध्ये वसुली करून आपण पुढे जाऊ असे सांगून रिक्षा रेल्वेमार्ग पार करून गेल्यावर आजूबाजूला कोणीही नाही याचा अंदाज घेऊन मुंढे यांच्या कानाजवळ हत्यार लावून गोळी झाडली. ती गोळी मानेजवळून निघून गेली असता घाबरलेल्या रिक्षाचालकाने बाहेर पडून अनोळखी व्यक्तीच्या हातातील गावठी कट्टा पकडण्याचा प्रयत्न केला. त्या झटापटीत दुसरी गोळी आकाशात उडाली असता. या वेळी रिक्षाचालकाने अंधारात उल्हास नदी पार करून मालेगाव गाठले. तेथे त्याला पोलीस पाटील भेटले. त्यांनी नेरळ पोलीस ठाण्यात संपर्क साधल्याने पोलीस रुग्णवाहिका घेऊन पोहचले व जखमी चालकाला रायगड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अनोळखी व्यक्ती आणि बदलापूर सोनिवली येथील एक अशा दोघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सोनिवलीतील व्यक्तीला  चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, तर अनोळखी व्यक्तीचा शोध सुरू आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply