वन्यजीव गणनेत विविध पशू-पक्ष्यांचे दर्शन
मुरूड ः प्रतिनिधी
मुरूड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात करण्यात आलेल्या वन्यजीव गणनेत पाणवठ्याच्या ठिकाणी बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत. त्याचबरोबर विविध पशू-पक्ष्यांचे दर्शन दर्शन घडले आहे. फणसाड अभयारण्यात बुद्धपौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात वन्यजीव गणना करण्यात झाली. सुमारे 54 चौरस किलोमीटर परिसरात या अभयारण्याची व्याप्ती असून समुद्रसपाटीपासून जवळ असणारे हे अभयारण्य आहे. जगातील सर्वांत लांब असलेल्या वेलींपैकी एक असलेली गारंबीची वेल या ठिकाणी आढळून येते. 90 प्रकारची फुलपाखरे येथे बागडताना दिसतात. यामध्ये ब्ल्यू मारगोन, मॅप, कॉमन नवाब अशा वैशिष्ट्यपूर्ण जातींचा समावेश आहे. फणसाड अभयारण्य प्रशासनाने तीन परिमंडळामध्ये 13 मचाण बांधून वन्यजीव गणना केली. वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रीन वर्क ट्रस्ट व ऑऊल फाउंडेशन तसेच मानद वन्यजीव सदस्य यांच्या मदतीने ही गणना करण्यात आली. या वेळी भेकर, रानडुक्कर, ससा, रानमांजर, रानगवा, शेकरू, सांबर, खवल्या मांजर आदींचे दर्शन झाले. विशेष म्हणजे काही पाणथळांवर बिबट्याच्या पाऊलखुणा आढळल्या. खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर बिबट्याचे अस्तित्व आढळून आल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. त्याचबरोबर मोर, ब्राह्मण घार, फ्रॉग बर्ड, हॉर्न बेल, रातवा, ब्लॅक दरांगो आदी पक्षी, प्राणी दिसले.
वन्यजीव गणना एक दिवसाची होती. त्यामुळे गणनेत आढळले तेवढेच वन्यजीव फणसाड अभयारण्यात आहेत असे समजण्यात येऊ नये. या अभयारण्यात वन्यजीवांची संख्या खूप मोठी असून ते विखुरलेले गेले आहेत.
-राजवर्धन भोसले, वनपरिक्षेत्र अधिकारी फणसाड अभयारण्य