तेलंगणामध्ये बारावीच्या परीक्षेच्या निकालांपाठोपाठ जे घडले ते सुन्न करणारे आहे. या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम तेलंगणा परीक्षा मंडळाने एका खासगी कंपनीकडे सोपवले आणि अवघ्या निकालांचा बट्याबोळ झाला असे बाहेर आलेल्या प्राथमिक माहितीवरून दिसते आहे. परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आठवडाभरात 20 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. आधीच यापूर्वी जगभरात भारताचे नाव आत्महत्यांची राजधानी म्हणून बदनाम झाले आहे. त्यात आता या विद्यार्थी आत्महत्यांची भर पडली आहे. या घटनेकडे निव्वळ तेलंगणातील समस्या म्हणून दुर्लक्ष करता येणार नाही.
दहावी-बारावी किंवा त्यापुढीलही अनेक महत्त्वाच्या प्रवेश परीक्षांच्या वेळेस आपल्याकडील विद्यार्थी किती पराकोटीच्या तणावाखाली असतात हे आपण सारेच जाणतो. परिस्थिती इतकी वाईट असते की विद्यार्थ्यांसोबतच त्यांचे पालकही ते अवघे वर्ष प्रचंड तणावासोबत घालवतात. तांत्रिक गडबड झाल्याने विद्यार्थ्यांना चुकीचे मार्क दिले गेले, असा खुलासा आता तेलंगणा परीक्षा मंडळाने केला आहे. तिथे एका विद्यार्थिनीला एका विषयात 0 गुण दिले गेले होते, जे पुढे 99 असल्याचे निष्पन्न झाले. कित्येक हजर विद्यार्थ्यांना परीक्षेस गैरहजर दाखवण्यात आले. यावरून एकंदरच तपासणी प्रक्रियेत किती प्रचंड गोंधळ झाला हे ध्यानात येते. स्वाभाविकच त्या राज्यात या आत्महत्यांनंतर प्रचंड जनक्षोभ उफाळून आला आहे. अर्थात परीक्षा मंडळाने खाजगी कंपनीवर अवघ्या गलथानपणाचे खापर फोडून हात झटकले आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, 2016 साली देशात 9,474 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्यांमध्ये 2,413 विद्यार्थ्यांनी कुठल्या न कुठल्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे आत्महत्या केली होती. पुढील शिक्षणाचा प्रवेश आणि भविष्यातील कारकीर्द हे पूर्णत: दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेतील गुणांवर अवलंबून असल्यामुळे विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत अडकतात. शाळा, पालक इतकेच काय एकंदरच अवघ्या समाजाकडून त्यांच्यावर विशिष्ट गुण मिळवण्याचा दबाव असतो. नुकत्याच लागलेल्या सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या निकालात 90-95 टक्क्यांच्या पुढे गुण मिळवणार्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड वाढल्याचे दिसून आले. इतके गुण मिळवूनही प्रवेशांची शाश्वती नसते. त्यामुळेच दहावी-बारावीच्या टप्प्यांवर विद्यार्थ्यांना हरतर्हेच्या विरंगुळ्यावर पाणी सोडून वर्षभर अथक मेहनत करणे भाग पडते. या सार्यात ज्ञानप्राप्तीसाठी शिक्षण असे न उरता निव्वळ गुणप्राप्तीसाठी घोकंपट्टी असे शिक्षणाचे स्वरूप बनले आहे. विक्रमी गुण मिळवून बड्या शिक्षण संस्थांमधून बाहेर पडणार्या विद्यार्थ्यांमध्ये कामासाठी उपयुक्त कौशल्यांचा अभाव दिसतो असे कॉर्पोरेट कंपन्या कानीकपाळी ओरडून सांगत आहेत. त्यामुळेच केंद्रातील तसेच राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारने कधीचेच कौशल्यविकासावर भर देणे सुरु केले आहे. सीबीएसईच्या बारावीच्या निकालांसोबतच विविध परीक्षांच्या निकालांचा मोसम सुरू झालाच आहे. सर्व स्तरावरील विद्यार्थ्यांना मानसिक बळ देण्याची नितांत गरज आहे. तेलंगणामध्ये जे घडले ते अक्षम्यच आहे. संबंधितांवर कठोर कारवाई ही झालीच पाहिजे. त्याचवेळेस याची पुनरावृत्ती देशात अन्यत्र कुठेही होणार नाही याकरिता सर्व राज्यांच्या शिक्षण मंडळांनी दक्ष राहण्याची तितकीच गरज आहे.