मनसोक्त संचार करणार्या मगरी पाहायच्यात ? केरळच्या बॅकवॉटरचा आनंद कोकणात मिळवायचा आहे? रम्य खाडी, संथ पाणी, किनार्यावरची टिपिकल किनारवर्ती गावं, किनार्याला बिलगलेले डोंगर, मध्येच पसरलेली छोटी-छोटी बेटं, त्यांचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब, विविध प्रकारच्या पक्ष्यांची ये-जा आणि तितकीच रम्य प्राचीनता अनुभवायची असेल तर पर्यटकांसाठी चिपळूणमध्ये ‘वाशिष्ठी बॅकवॉटर’ हा सर्वोत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. वाशिष्ठी खाडीला निसर्गानं मुक्तहस्तानं सौंदर्य दिलं आहे. इतकी वर्षं हे सौंदर्य लोकांपुढे आलं नव्हतं. ‘ग्लोबल चिपळूण पर्यटन’ या चिपळूण पर्यटन विकासासाठी झटणार्या संस्थेच्या सततच्या प्रयत्नाने आता येथे पर्यटकांची लगबग सुरू झाली आहे.
आपल्या देशात फक्त चेन्नईत क्रोकोडाईल पार्क आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी मगरी पाहता येतात. ‘क्रोकोडाईल सफारी’चा वैविध्यपूर्ण अनुभव देणारा वाशिष्ठी बॅकवॉटर हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम आहे. ‘मगर’ चिपळूणच्या पर्यटन विकासाचे मुख्य आकर्षण ठरू शकते, याची जाणीव झालेल्या चिपळूणातील पर्यटनप्रेमींनी ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’ संस्थेच्या माध्यमातून ‘क्रोकोडाईल सफारी’ उपक्रम सुरु केला आहे. आजतागायत इथल्या मगरींनी कोणावरही कधीही हल्ला केल्याचे वृत्त नाही. या मगरी ओहोटी दरम्यान वाशिष्ठी खाडीच्या किनार्यावर पहुडलेल्या सहज नजरेस पडतात. अगदी 8-10 फुटाच्या अंतरावरून त्या पाहण्याचा आनंदही घेता येतो. विशेष म्हणजे त्यांना खाडीतील नैसर्गिक वातावरणात पाहाता येते. मायबाप शासनाने, चेन्नईप्रमाणे येथेही ‘क्रोकोडाईल पार्क’ची शक्यता तपासण्याची तसेच या मगरींचा शास्त्रोक्त अभ्यास करण्याची नितांत गरज आहे. सध्या इथल्या मगरी या चिपळूण पर्यटन व्यवसायाला आकार देण्याचे काम करत आहेत हे नक्की ! वाशिष्ठीच्या बॅकवॉटरमध्ये दिवसभर क्रोकोडाईल टुरिझमचा आनंद मिळण्यासाठी ग्लोबल चिपळूण टुरिझम संस्थेने पर्यटक बोटींची सुविधा निर्माण केली आहे. सन 2014 पासून वर्षातून दोन वेळा नववर्ष स्वागत आणि उन्हाळी पर्यटन हंगामात सकाळी 10 ते सायंकाळी 6 वा. या वेळेत हा पर्यटन उपक्रम आयोजित केला जात असून प्रतिवर्षी किमान सुमारे 25 हजार पर्यटकांची सतत उपस्थिती यास लाभते आहे. चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यातील हिरवेगार निसर्गवैभव, इथल्या रमणीय खाड्या-सागरकिनारे, गड-किल्ले, प्राचीन मंदिरे यांसह चिपळूण परिसरातील वाशिष्टी खाडी, तिच्यातील छोटी-मोठी बेटे, सह्याद्रीच्या पर्वत रांगा, कोकणी खाद्यपदार्थ आणि येथील समृद्ध लोकजीवनाचा अनुभव पर्यटकांना मिळतो आहे. खाडीत साधारणत: पाण्याच्या ठिकाणी आढळणारे पक्षी दिसतातच, पण वूली नेक्ड स्टॉर्क, ओरिएंटल हनी बझार्ड, पफ थ्रोटेड बॅब्लर, लिटिल रिंग प्लोव्हर, युरेशियन कॉलर्ड डव्ह, प्लेन प्रिनिया, अॅशी प्रिनिया, लिटिल स्टिंट, मार्शलज आयोरा, कॉमन आयोरा, पाइड अॅव्होसेट, सिट्रिन वॅगटेल, युरेशियन स्पूनडिल, ब्लॅक हेडेड आयबीस, कॉमन रेडशॅक, चेंजेबल हॉक इगल, ब्राम्हिणी काईट, मोर, टेंटेड स्टॉर्क, जांभळी पाणकोंबडी, आयबीस, डार्टर, आल्बिनो किंगफिशर, हेरॉन आदि दुर्मीळ पक्ष्यांचं दर्शनही येथे होते. ‘क्रोकोडाईल सफारी’साठी सुशोभित आणि अद्ययावत बोटींची व्यवस्था करण्यात येते. गेल्या मे 2018 मध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबई-पुण्यातील साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत ‘समर बोटिंग आणि क्रोकोडाईल सफारी’चे उद्घाटनासाठी चिपळूणात आलेल्या नामवंत हास्यकवी अशोक नायगावकर यांनीही ‘वाशिष्ठी नदीतील पर्यटनाला अत्याधुनिक पातळीवर आणा’ असा सल्ला दिला होता. साधारणतः 10-12 वर्षांपूर्वी मालदोलीचे संदेश आणि शैलेश संसारे, तुंबाडचे शैलेश वरवाटकर, हॉटेलियर रविकिरण जाधव यांनी खाडीत ‘क्रोकोडाईल सफारी’ची सुरुवात केली. त्यानंतर सन 2010 साली संपूर्ण कोकणात ‘क्रोकोडाईल टुरिझम’साठी ‘मालदोली (वाशिष्ठी) बॅकवॉटर’ हा सर्वोत्तम पर्याय असल्याचा निर्वाळा आम्हीही रत्नागिरी जिल्ह्यातील अभ्यासू तरुणांचे संघटन असलेल्या ‘झेप क्षितिजापलीकडे’ संस्थेच्या आनंदमेळ्यादरम्यान दिला होता.
वाशिष्ठी ही कोकणातली एक महत्त्वाची नदी आहे. तिची एकूण लांबी सुमारे 70 किलोमीटर आहे. ती पूर्णपणे रत्नागिरी जिल्ह्यातूनच वाहते. सह्याद्रीतल्या रत्नागिरी-सातारा जिल्हा सीमा जोडणार्या कुंभार्ली घाटात, घाटमाथ्यावरील झोका दगडाला लागून असलेल्या खोल दरीत तिचा उगम आहे. या उगमाचा शोध आम्ही नव्याने, नामवंत इतिहास संशोधक अण्णा शिरगावकर यांच्या ‘वाशिष्ठीच्या तीरावरून’ या संशोधित ग्रंथाच्या निर्मितीची गरज म्हणून सन 2015 साली सहकारी मित्र वन्यजीव अभ्यासक सदफ कडवेकर आणि विलास महाडिक यांच्या साथीने घेतला होता. नैसर्गिकदृष्ट्या कोणत्याही नदीचे मुख हा एक अद्भुत जादुई प्रदेश ठरावा, वाशिष्ठीबाबतही तसेच आहे. आगामी काळात ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’च्या माध्यमातून ‘वाशिष्ठी सफर (परिक्रमा) : उगम ते संगम’ हा चिपळूण पर्यटनातील महत्वकांक्षी उपक्रम पर्यटकांसाठी सुरु केला जाणार आहे. या प्रकल्पाची चाचणी सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. वाशिष्ठी नदी चिपळूण, खेड, गुहागर, दापोली तालुक्यांच्या सीमांतून वाहत दाभोळजवळ अरबी समुद्राला मिळते. खेडकडून येणारी जगबुडी ही वाशिष्ठीची प्रमुख उपनदी आहे. या वाशिष्ठीला नारिंगी, तांबी, धावती नदी, वैतरणा आणि शिवनदी येऊन मिळतात. कोयना अवजलमुळे वाशिष्ठी सदा भरलेली, वाहणारी असते. या वाशिष्ठीचे खोरे 2200 चौरस किलोमीटरचे आहे. अचाट वैविध्याची रेलचेल असलेल्या या खोर्यात वेगवेगळ्या प्रकारच्या विहिरी, बाव, तळी, पाणी वापराच्या इतर पारंपरिक पद्धती, झरे, धबधबे, छोटे ओहोळ, खारफुटीची जंगले, ससे, साळींदर, बिबटे, कोल्हे, रानगवे, अन्य प्राणीसंपदा असून ही सगळी वाशिष्ठीची जिवंत रूपे आहेत. फार पूर्वी शिवनदी हीच चिपळूणची जीवनवाहिनी होती. चिपळूण शहरातून वाहणार्या शिवनदीचा उगम कामथे-कापसाळ परिसरात, डोंगरात होतो. शिवनदी शहराच्या मध्यभागातून वाहते. तिच्या प्रवाहामुळे शहराचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग नैसर्गिकरीत्या निर्माण झाले आहेत. तिची शहरातली लांबी सुमारे दीड किलोमीटर आहे. या नदीवर कामथे आणि फणसवाडी असे दोन बंधारे आहेत. शिवनदीपात्रातून चिपळूणमधील पागमळ्यापर्यंत पूर्वी लहान होड्यांचा प्रवास चाले. मालवाहू-प्रवासी गलबते गोवळकोट बंदरातून, वाशिष्ठी नदीमार्गे बाजारपूल, बंदरनाका परिसरात येत. तिथे गलबतातील माल हा लहान नावांत घालून शिवनदी पात्रातून पागमळा परिसरात चढ-उतारासाठी येत असे. वाशिष्ठीला कोयनेचे अवजल उपलब्ध झाल्यानंतर झपाट्याने शिवनदीचे महत्त्व कमी होऊन तिचे अस्तित्व कचरा, गाळ, दूषित सांडपाणी यांमुळे संपल्यात जमा आहे. शासनाने जलसंपदा खात्याचे निवृत्त सचिव म. दि. पेंडसे यांच्या अध्यक्षतेखाली 25 ऑक्टोबर 2005 रोजी या कोयनेच्या अवजलाचा वापर कशा प्रकारे करावा? याबाबत उपाय सुचवण्यासाठी 5 सदस्यीय अभ्यास गटाची स्थापना केली होती.
दिनांक 29 ऑगस्ट 2006 रोजी या समितीने राज्य शासनाला आपला अहवाल सादर केला. या पाण्याच्या मदतीने कोकणातील सुमारे 1,70,505 एकर क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते, असे पेंडसे समितीचा अहवाल सांगतो. सुमारे 400 पानांचा हा अहवाल सन 2013 सालापर्यंत सामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आला नव्हता. राजकीय साठमारीत पेंडसे समितीचा अहवाल आजही इतर अनेक अहवालांप्रमाणे धूळ खात पडला आहे. संघर्षाची फार मानसिकता नसलेल्या इथल्या जनतेला, लोकप्रतिनिधींना या पाण्याच्या पुन:र्वापराद्वारे संपूर्ण कोकणची तहान भागवावी यासाठी आपण सर्वपक्षीय एकत्र यावे असे कधीही वाटलेले नाही. लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीचे रासायनिक प्रदूषण, सडणार्या पाईपलाईन, जळणारी पिके, कमी होत गेलेली मस्यसंपदा, पशुपक्षी, मातांच्या दुधात मिळणारे अवजड धातूंचे अंश, बेकायदा वाळू उपसा इतके होऊनही वाशिष्ठी अजूनही संपलेली नाही.
-धीरज वाटेकर, चिपळूण