मंकीपॉक्स या देवीसदृश आजाराच्या जगभरात 100 हून अधिक केसेस नोंदल्या गेल्या असून आणखी तितक्याच संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. ही आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केली असून या केसेस एकूण 20 देशांमधील आहेत. भारतात तूर्तास एकही केस नोंदली गेलेली नाही. जगभरातील केसेसचे प्रमाण अद्याप तरी आटोक्यात आणण्याजोगे असले तरी आता कुठे कोरोनाच्या महासाथीतून जग सावरत असल्यामुळे सगळीकडेच त्याविषयी चिंता व्यक्त होते आहे.
आपल्याकडे काही वर्षांपूर्वी आढळणार्या देवीच्या साथीसारखाच हा आजार असला तरी देवीच्या तुलनेत यातील मृत्यूचे प्रमाण पाहता तो सौम्य मानला जातो. विशेषत: आफ्रिकन देशांमध्ये मंकीपॉक्स गेली काही दशके माफक प्रमाणात दिसून आला आहे. त्यामुळेच आता अचानक जगभरातील निरनिराळ्या देशांमध्ये या रोगाचा फैलाव दिसून येणे तज्ज्ञांनाही आश्चर्यकारक वाटते आहे. सध्या या आजाराचे सर्वात जास्त रुग्ण पोर्तगाल, स्पेन आणि ब्रिटन या देशांमध्ये आढळले आहेत. त्याखेरीज ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, अमेरिका, इटली, जर्मनी, फ्रान्स, स्वीडन, नेदरलँड्स, कॅनडा या देशांमध्येही मंकीपॉक्सच्या रुग्णांची नोंद झाली आहे. या सर्व केसेसचा परस्परांशी काही संबंध आहे की हा फैलाव सगळीकडे निरनिराळ्या विषाणूमार्फत सुरू झाला आहे याबाबत लगेचच माहिती जमा झालेली नाही. या आजाराची लागण मूलत: प्राण्यांपासून माणसास होते. याच्या नावात मंकी अर्थात माकड असा उल्लेख असला तरी माकडांपासून हा आजार होतो असे नाही. कित्येक दशकांपूर्वी माकडांमध्ये हा आजार दिसू लागल्यावर शास्त्रज्ञांना त्याची माहिती झाली, यामुळे त्याचे नाव मंकीपॉक्स असे ठेवले गेले. अगदी अलीकडच्या काळात 2003 साली अमेरिकेमध्ये या आजाराच्या 71 केसेस आढळल्या होत्या आणि त्या आफ्रिकेतून आलेल्या कुणा व्यक्तीमुळे नव्हे तर पश्चिम आफ्रिकी देशामधून आयात केलेल्या उंदरांमधून कुत्र्यांमध्ये संसर्ग होऊन नंतर माणसामध्ये त्याचे संक्रमण झालेले दिसले होते. सध्या आढळलेला मंकीपॉक्सचा विषाणू हा तीन-चार वर्षांपूर्वी अनेक देशांमध्ये आढळलेल्या या आजाराच्या विषाणूसारखाच बर्यापैकी आहे. म्हणजेच त्यात फारसा बदल झालेला नाही. साथ आटोक्यात ठेवण्याच्या दृष्टीने हे फार महत्त्वाचे आहे. अर्थात हे सारे निष्कर्ष तूर्तास जुजबी माहितीवर आधारित आहेत. जगभरातून येणारी माहिती शास्त्रज्ञ सध्या पडताळून पाहात आहेत. नजीकच्या संपर्कातून या आजाराची लागण होते. लैंगिक संबंधातूनच ती होते असे नाही आणि समलिंगी संबंधातूनच ती होते असे तर मुळीच नाही याचा खुलासा शास्त्रज्ञांनी केला आहे. भिन्नलिंगी व्यक्तींच्या लैंगिक संबंधातूनही या आजाराची लागण होऊ शकते. मुळात लैंगिक संबंधांखेरीज कुठल्याही प्रकारे नजीकचा संपर्क आल्यास या आजाराचा फैलाव होऊ शकतो हे लक्षात घेण्याची गरज आहे. ताप, पाठदुखी, सांधेदुखी व त्यानंतर अंगावर, विशेषत: चेहर्यावर येणारा कांजिण्यांसारखा पुरळ अशी याची लक्षणे असतात. हा पुरळ आल्यानंतरच्या काळात त्यात जंतुसंसर्ग झाल्यासच जिवाला धोका संभवू शकतो. अद्यापपर्यंत या साथीत कुणीही दगावल्याचे वृत्त नाही. चांगल्या आरोग्यसुविधा उपलब्ध असलेल्या देशांमध्ये या साथीचा मृत्यूदर आजवर 1 ते 3 टक्केच दिसून आलेला आहे. या आजारावरील लस उपलब्ध आहे आणि ती निदानानंतर दिल्यासही काम करते ही बाब सर्वाधिक दिलासादायक असली तरी सध्या सर्वांनी सावधगिरी बाळगणेच योग्य ठरेल.