पावसाळी वातावरणामुळे पुरातत्त्व विभागाचा निर्णय
मुरूड ः प्रतिनिधी
पावसाळा जवळ आल्याने समुद्रात उसळणार्या मोठ्या लाटांच्या पार्श्वभूमीवर मुरूडजवळील राजपुरी येथील सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला गुरुवार (दि. 26)पासून पर्यटकांना बंद ठेवण्यात येणार आहे. पुरातत्त्व खात्याने तशी घोषणा केली आहे. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी राजपुरी येथून बोटीने जावे लागते. पावसाळा जवळ आल्याने समुद्रातील लाटांचे प्रमाण वाढले आहे. या लाटा किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशीही धडकत आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पावसाळी हंगाम संपेपर्यंत किल्ला बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पुरातत्त्व खात्याचे अधिकारी बजरंग ऐलीकर यांनी दिली.