पनवेल ः प्रतिनिधी
पनवेलचा छत्रपती शिवाजी महाराज चौक इलेक्ट्रिक केबलच्या जाळ्यातून मुक्त करण्यात आला आहे. महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी त्या ठिकाणी भूमिगत वायरिंग करण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे तेथे भूमिगत वायरिंग झाल्याने चौकाच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पनवेल शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ महापालिकेने शिवसृष्टी साकारून मावळे आणि झूल घातलेल्या हत्तींचे शिल्प बसवल्याने येथील सौंदर्य खुलले आहे. पनवेलकर हे शिल्प पहाण्यासाठी आणि त्याचे फोटो काढण्यासाठी त्या ठिकाणी गर्दी करीत असतात, पण तेथील आजूबाजूच्या खांबावरील इलेक्ट्रिकच्या केबलच्या जाळ्यामुळे हा परिसर विद्रूप दिसत असे. फोटोमध्येही त्या केबल्स दिसत असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी त्या ठिकाणी भूमिगत वायरिंग करण्याची मागणी केली होती. सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या सुचनेनुसार महापालिकेने त्या ठिकाणी हायमास्टसाठी असलेल्या इलेक्ट्रिक खांबावरील केबल व आजूबाजूच्या खांबावरील केबल भूमिगत करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचे काम पूर्ण झाल्याने आता हा परिसर स्वच्छ व सुंदर दिसत आहे. याबद्दल अनेकांनी सभागृह नेते परेश ठाकूर यांची भेट घेऊन आभार मानले.
कोकणच्या प्रवेशद्वार असलेल्या पनवेल शहरात महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराजांचे बनवलेले स्मारक पाहून मनाला समाधान मिळते. त्या ठिकाणी असलेले इलेक्ट्रिक केबलचे जाळे काढल्यामुळे या चौकाच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. यासाठी सभागृह नेते परेश ठाकूर यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.
-वैशाली पाटील, शिक्षिका