सभापती हर्षदा उपाध्याय यांच्या पाठपुराव्याला यश
पनवेल : प्रतिनिधी
महिला व बालकल्याण सभापती हर्षदा अमर उपाध्याय यांच्या एक वर्षाच्या पाठपुराव्याला यश येऊन खारघरमध्ये दैनिक बाजार विकसित करण्याला मंगळवारच्या महासभेत मंजूरी देण्यात आली.
पनवेल महानगरपालिकेकडे सिडकोमार्फत हस्तांतर झालेले खारघर, सेक्टर 12 मधील 876.14 चौ.मी क्षेत्रफळ असलेला उ-46 क्रमांकाचा भूखंडावर दैनिक बाजार विकसित करण्याच्या प्रस्तावास मंगळवारच्या सर्वसाधारण सभेच्या मान्यता देण्यात आली आहे. लवकरच येथे सुसज्ज दैनिक बाजार उभारून 43 फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध होणार आहे.
या भूखंडाशेजारी जुने खारघर पोलीस स्टेशन असल्यापासूनचे सर्व प्रकारच्या अवजड वाहनांनी या भूखंडाची 70 टक्के जागा व्यापली गेली होती व 30 टक्के जागा उपलब्ध होती. तेथे पंधरा वर्षांपासून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. तेथील नागरिकांना वारंवार आरोग्याच्या दृष्टिकोनातून होणारा त्रास लक्षात घेऊन खारघरचे तत्कालीन सीनिअर पोलीस इन्स्पेक्टर शत्रुघ्न माळी व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर तसेच सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या सहकार्यामुळे या भूखंडावरील वाहने नवीन खारघर पोलीस चौकी समोर स्थलांतरित करण्यात येऊन भूखंड स्वच्छ करून 30 ते 35 फेरीवाल्यांना तेथे व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती
काही समाजकंटक राजकारणी लोकांच्यामुळे तेथील फेरीवाल्यांनी स्वखर्चाने बांधलेल्या प्लास्टिक शेड वर्षभरात साधारण तीन वेळा कधी सिडको तर कधी महापालिकेमध्ये वारंवार तक्रार करून तोडण्यात आले. पनवेल महापालिकेच्या आयुक्तांनी या विषयांकडे गांभीर्याने लक्ष दिल्यामुळे हा विषय सभागृहात मंजूर झाला.