Breaking News

पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी विविध लाभ;

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली महत्त्वपूर्ण घोषणा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांना सक्षम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. 30) पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत पीएम केअर फंडातून अनाथ मुलांच्या बँक खात्यात शिष्यवृत्ती पाठविण्यात येणार आहे. या वेळी पंतप्रधान मोदींनी अनाथ मुलांच्या पाठीशी केंद्र सरकार भक्कमपणे उभे असून या मुलांना सर्व प्रकारची मदत सरकार देईल, असे आश्वासित केले. मी तुमच्याशी कुटुंबातील सदस्य म्हणून बोलत आहे. कोरोनामुळे ज्यांनी जवळच्यांना गमावले त्यांच्या आयुष्यातील हा कठीण काळ होता. त्यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. अशा मुलांच्या भविष्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी दिली. पीएम केअर फॉर चिल्ड्रन हा कोरोनाबाधित मुलांसमोरील समस्या कमी करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. प्रत्येक देशवासी अत्यंत संवेदनशीलतेने या मुलांच्या पाठीशी आहे. त्यांच्या चांगल्या शिक्षणासाठी त्यांना घराजवळच्या सरकारी किंवा खासगी शाळेत दाखल करण्यात आले आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी, उच्च शिक्षणासाठी एज्युकेशन लोनची आवश्यकता असल्यास पीएम केअर्स त्यातही मदत करणार आहे. इतर योजनांच्या माध्यमातून अशा मुलांना दैनंदिन गरजांसाठी दरमहा चार हजार रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. ही मुले त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण करतील तेव्हा भविष्यासाठी अधिक पैशांची गरज भासेल. याकरिता 18 ते 23 वर्षे वयोगटातील तरुणांना दरमहा स्टायपेंड मिळेल आणि मुले 23 वर्षांची झाल्यावर त्यांना 10 लाख रुपये मिळतील. याव्यतिरिक्त आयुष्मान कार्डद्वारे आरोग्य सुरक्षा आणि मानसिक व भावनिक मदतीसाठी संवाद हेल्पलाइनद्वारे भावनिक समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आयुष्मान हेल्थ कार्ड या मुलांना पीएम केअर्स फॉर चिल्ड्रनद्वारे दिले जात आहे. या अंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळणार आहे,  अशी माहितीही पंतप्रधानांनी दिली.

 

रायगडात केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते 26 बालकांना लाभ, सेवाकिटचे वाटप

अलिबाग ः  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी (दि. 30) पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजनेंतर्गत देशभरातील कोविड-19मुळे अनाथ झालेल्या बालकांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लाभ जारी करण्यात आले. रायगड जिल्ह्यात केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते बालकांना लाभाचे वाटप जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) अमित सानप, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विनीत म्हात्रे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अशोक पाटील, राष्ट्रीय सूचना व विज्ञान केंद्राचे चिंतामणी मिश्रा आदी उपस्थित होते. कोविडमुळे अनाथ झालेल्या रायगड जिल्ह्यातील 26 बालकांना केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते लाभ आणि सेवांबाबतच्या पीएम केअर्स लाभार्थी किटचे वाटप करण्यात आले. यात 18 वर्षावरील सहा, तर 18 वर्षाखालील 20 अनाथ बालकांचा समावेश आहे. या वेळी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले की, कोविड-19मुळे अनाथ झालेल्या बालकांना मदतीचा हात देण्याचा हा एक भावनात्मक असा कार्यक्रम होता. या काळात अनाथ झालेल्या बालकांची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून नाही, तर या बालकांचे पालक म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून या अनाथ बालकांशी संवाद साधला. देशाचे पंतप्रधान किती संवेदनशील आहेत हे यावरून दिसते. या बालकांच्या भविष्याची चिंता मिटविण्यासाठी केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारनेही योगदान दिले आहे. प्रधानमंत्री केअरमध्ये देशाच्या अनेक लोकांनी त्यांचा निधी दिलेला आहे याचा अर्थ असा की, या देशातल्या 130 कोटी जनतेने खर्‍या अर्थाने या सगळ्या अनाथ बालकांचे पालकत्व स्वीकारले आहे हे विशेष कौतुकास्पद आहे. शेवटी या अनाथ बालकांच्या आई-वडिलांनी त्यांच्यासाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. पालक नसण्याची कमतरता भासू नये यासाठी विविध क्षेत्रांत कार्यरत असणार्‍या व्यक्ती, संस्थांनी या बालकांना भावनिक, आर्थिक, सामाजिक आधार देण्यासाठी पुढे यावे. त्यांच्या पालकांसाठी हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे आवाहनही ना. पाटील यांनी केले.

Check Also

‘सामना’ पन्नाशीचा झाला…

काही कलाकृतींचे महत्त्व व अस्तित्व हे कायमच अधोरेखित होत असते. ते चित्रपटगृहातून उतरले तरी त्यांचा …

Leave a Reply