कारागृहातील मुक्काम 14 दिवसांनी वाढला
पनवेल ः प्रतिनिधी
मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये असलेले कर्नाळा बँकेचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांचा तुरुंगातील मुक्काम 5 ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा आदेश सत्र न्यायालयाने दिला आहे तर विवेक पाटील यांच्या मागणीवरून त्यांना आता त्यांच्या घराजवळील तळोजा तुरुंगात हलविण्यात येणार आहे.
प्रकृतीचे कारण पुढे करीत, ‘ऑर्थर रोड जेलऐवजी माझ्या घरावळील तळोजा जेलमध्ये मला हलवावे,’ अशी मागणी घोटाळेबाज विवेक पाटील यांनी न्यायालयाकडे केली होती. यावर जेल प्रशासनाने दिलेल्या अहवालानंतर न्यायालयाने त्यांना तळोजा जेलमध्ये हलविण्यास परवानगी दिली आहे.
विवेक पाटील यांच्या वकिलांनी मागील झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाकडे विविध मागण्या केल्या होत्या. त्यापैकी त्यांची न्यायालयीन सुनावणी यापुढे व्हिडीओ कॉन्फरन्समार्फत व्हावी, अशीही मागणी केली होती. त्यामुळे यापुढे विवेक पाटील यांची सुनावणी यापुढे व्हिडीओ कॉन्फरन्समार्फत होणार आहे.
विवेक पाटील यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत 22 जुलै रोजी पूर्ण होत असल्याने त्यांना गुरुवारी (दि. 22) न्यायालयात हजर करण्यात आले होते. ‘ईडी’तर्फे सुनील गोन्साल्विस, तर विवेक पाटील यांच्यातर्फे हृषिकेश मुंदरगी बाजू मांडत होते. आता पुढील सुनावणी 5 ऑगस्ट रोजी होणार आहे.