कर्जत ः बातमीदार
शाळेत जाणारे विद्यार्थी हे आईला भरवायला सांगतात किंवा आईच्या हाताने बनविलेले पदार्थ खाण्याचे काम करतात, मात्र नेरळ येथील हाजी लियाकत हायस्कूलने लहानग्यांच्या हातांना आणि त्यांच्या कल्पनांना वाव देण्याचा प्रयत्न करताना विद्यार्थ्यांना ज्युनियर शेप बनविले. या आगळ्यावेगळ्या स्पर्धेत कर्जत तालुक्यातील 13हून अधिक शाळांचा सहभाग राहिला आणि 413 मास्टर शेप वेगवेगळे पदार्थ बनविताना दिसून आले.
नेरळ-कर्जत रस्त्यावर नेरळमधील हाजी लियाकत इंग्लिश मीडियम हायस्कूल ही शाळा असून वेगवेगळे उपक्रम राबविणारी शाळा म्हणून ओळखली जाते. या शाळेत संस्थेचे संचालक अब्दुल रहेमान सहेद यांनी विद्यार्थ्यांसाठी मास्टर शेप-2019 या आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले होते. शाळेच्या प्रशस्त मैदानात आयोजित या स्पर्धेत विद्यार्थ्यांना गॅस शेगडीचा वापर न करता पदार्थ बनवायचे होते. शिशूपासून दहावीपर्यंत विद्यार्थ्यांचे पाच गट बनविण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बनविलेले पदार्थ चाखून त्यांना नंबर देण्यासाठी मुंबईमधील अंजुमन-ई-इस्लाम हॉटेल मॅनेजमेंट स्कूलचे विद्यार्थी आले होते. शनिवार (दि. 21) झालेल्या स्पर्धेत कर्जत तालुक्यातील एलएईएस शाळा, नेरळ विद्या मंदिर, नेरळ विद्या विकास, जेनीज ट्युलिप, कन्याशाळा जिल्हा परिषद, उर्दू शाळा जिल्हा परिषद, आचार्य शेलू, दामत उर्दू, बेबी एंजल्स, न्यू बेबी अँजल्स, शेंडे विद्यालय, तसेच हाजी लियाकत स्कूलचा सहभाग होता.
413 विद्यार्थ्यांचा या मास्टर शेप 2019 स्पर्धेत सहभाग होता आणि त्यावेळी सर्व स्पर्धकांना आयोजक यांच्याकडून दिलेल्या शेपसारख्या टोप्यांमुळे स्पर्धेला खर्या अर्थाने जान आली होती. स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांचे कौतुक करण्यासाठी नेरळ ग्रामपंचायतचे सरपंच रावजी शिंगवा, उपसरपंच शंकर घोडविंदे, ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश मोरे, उमा खडे, जयश्री मानकामे, गीतांजली देशमुख आदीसह संस्थेचे प्रमुख लियाकत सहेद तसेच संकल्पना संचालक अब्दुल रहेमान सहेद, संयोजक राजकोटवाला आणि मुख्याध्यापक मिलिंद जोशी यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या टेबलजवळ जाऊन पदार्थ चाखून बघितले आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले, तर स्पर्धक विद्यार्थ्यांनी बनविलेले पदार्थांचे परीक्षण मुंबईमधील अंजुमन हॉटेल मॅनेजमेंट स्कूलचे शेप राज कोकाटे, सिद्धेश काळे, संयुक्ता वाईक, अख्तर शेख, सिद्धेश पवार आणि दीपक ढमाले यांनी केले.
ज्युनियर मास्टर शेप -2019 स्पर्धेत श्रेया जैन प्रथम, तर माही परदेशी दुसरी व रुचिता पाटील तिसरी आली. ब गटात अक्षय ठाकूरने पहिला, मोनिका गोरा दुसरी व अस्मिता शिंदे तिसरी आली. क गटात तन्वी पटवर्धन पहिली, कनिष्का सुर्वे दुसरी व सिमरया शेख तिसरी आली. ड गटात दृष्टी जैनने बनविलेल्या डिशला पहिला क्रमांक मिळाला. रेणू जैनने दुसरा व अनिता नझीम मेमन तिसरी आली. पाचव्या गटात नेहा जैन पहिली, रेणू जैन दुसरी आणि दर्शना मुरकुटेने तिसरा क्रमांक पटकावला. स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफी आणि प्रशस्तिपत्रक तसेच सहभागी सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांनाही प्रशस्तिपत्रक देण्यात आले.