Breaking News

पनवेल तिसरी मुंबई होईल -देवेंद्र फडणवीस

पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल शहर आटोपशीर आहे. त्याचा योग्य प्रकारे विकास केल्यास ही तिसरी मुंबई होईल आणि पुढच्या काळात मुंबईचा विकास इकडेच होईल. स्मार्ट नियोजन केल्यास पनवेल महापालिका नंबर वन बनू शकते, असा विश्वास माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 3) येथे व्यक्त केला. या वेळी त्यांनी मालमत्ता करप्रश्नी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केल्यास तसेच सरकार आणि महापालिका एकत्र बसल्यास निश्चित मार्ग निघू शकेल, असेही नमूद केले. पनवेल महापालिकेच्या स्वराज्य या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन, विविध योजनांचे भूमिपूजन आणि इतर विकासकामांचा लोकार्पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या सोहळ्यात ते बोलत होते. महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, श्रीरंग बारणे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी मंत्री व विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, माजी मंत्री व विद्यमान आमदार रविशेठ पाटील, माजी मंत्री राम शिंदे, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डावखरे, बाळाराम पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, भाजप प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, आयुक्त गणेश देशमुख, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे तसेच सभापती, नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, आपल्या देशात शहरीकरण सातत्याने होत असते. आपण त्याला अभिशाप समजायचो, पण आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्हीजन आहे व त्यांनी सांगितले की, शहरीकरणाला शिव्याशाप देऊन आपण ते कधीच थांबवू शकत नाही. शहरे ही एका चुंबकासारखी केंद्र असतात, कारण त्या ठिकाणी शिक्षण, आरोग्य व मनोरंजन असल्याने लोक त्या ठिकाणी जातात. त्याला विरोध केल्यास झोपडपट्ट्या वाढतात. त्यामुळे त्या भागाचे प्लॅनिंग केले पाहिजे. त्याला अभिशाप न म्हणता संधी समजली पाहिजे. देशाचा 60 टक्के जीडीपी शहरात तयार होत असल्याने तेथे इन्फ्रास्ट्रकचर तयार केले पाहिजे. यासाठी प्रधानमंत्री आवास योजना, अमृतकुंभ जल योजना अशा 10 वेगवेगळ्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या सोहळ्यात रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस हे उत्तम मुख्यमंत्री होते यात दुमत नाही असे गौरवोद्गार काढले. देवेंद्र फडणवीस हे जेव्हा मुख्यमंत्री होते त्या वेळेस नगरपालिका, महापालिका कोणत्या पक्षाकडे आहे याकडे लक्ष न देता त्यांनी वेळोवेळी निधीचे वितरण केले. माझ्या रोहा नगरपालिकेलाही त्यांनी सातत्याने निधी देण्याचे काम केले, अशा शब्दांत खासदार सुनील तटकरे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर कौतुक केले. खासदार श्रीरंग बारणे यांनीही विकासासाठी विरोध न करता सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे, असे म्हटले.

पनवेल मनपा हद्दीत विकास होतोय -आमदार प्रशांत ठाकूर

या वेळी आमदार प्रशांत ठाकूर आपल्या भाषणात म्हणाले की, आम्ही मागणी केल्यावर फडणवीससाहेबांनी पाठबळ दिले, म्हणून पनवेल महापालिका होऊ शकली. त्याबद्दल आभार मानतो. आता एक-एक सेवा महापालिकेच्या वतीने द्यायला सुरुवात केली आहे. आरोग्यसेवा ताब्यात घेतली त्याबद्दल केंद्र सरकारचे बक्षीस मिळाले. या महापालिका हद्दीतील वेगवेगळ्या भागांचा विकास होतोय. आम्ही पनवेलचे शेवटचे टोक असलेल्या धानसर गावापासून कामाला सुरुवात केली आहे. मालमत्ता कराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सिडको वसाहतीत सिडको सर्व्हिस चार्जेस घेते तो माफ करावा किंवा महापालिका तो भरण्यास तयार आहे. यासाठी व जीएसटी अनुदानाबाबत पालकमंत्री आदितीताईंनी सहकार्य करावे.

पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडून अभिनंदन

पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पनवेल महापालिका स्थापन झाल्यानंतर पहिल्याच टर्ममध्ये भव्य प्रशासकीय कार्यालय बांधत असल्याबद्दल अभिनंदन करून नवी मुंबईपेक्षा अधिक चांगली इमारत सर्वांच्या सहकार्याने उभी राहील, असा विश्वास व्यक्त केला. महापालिका हद्दीतील पांडवकडा हे चांगले पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा आराखडा तयार केल्याचेही त्यांनी सांगितले.

सिडको, एमएमआरडी व नैना यामध्ये असलेल्या पनवेल शहराच्या महापालिकेची निर्मिती देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे झाली. महापालिकेचे उत्पन्न कमी असतानाही कार्यालयाची भव्य वास्तू उभारण्याचे धाडस केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन! पनवेल महापालिका ही रायगडची अस्मिता आहे. या शहराच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून सामुदायिक प्रयत्न करण्याचे आश्वासन देतो.
-सुनील तटकरे, खासदार, रायगड

पनवेल महापालिका ही नव्याने निर्माण होत असतानाही एका सर्वसामान्य महिलेला महापौर या महत्त्वाच्या व जबाबदारीच्या पदावर बसवण्याची किमया केवळ लोकनेते रामशेठ ठाकूर व भारतीय जनता पक्षच करू शकतो. इतकेच नव्हे; तर केवळ स्थायी समिती सभापती हे पद वगळता महापौर, उपमहापौर, चारही प्रभाग समिती सभापती, महिला बालकल्याण सभापती या महत्त्वाच्या पदांवर महिलाराज विराजमान असून महापालिकेचा कारभार यशस्वीपणे महिलांनी सांभाळला आहे.
-डॉ. कविता चौतमोल, महापौर

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply