Breaking News

बारणे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार

खोपोली : प्रतिनिधी शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार, विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स येथे कार्यकर्ता मेळावा आयोजत करण्यात आला होता. या वेळी प्रचाराचा नारळ मान्यवरांच्या हस्ते वाढविण्यात आला. शिवसेनेच्या उपनेत्या, आमदार डॉ. नीलम गोर्‍हे, मावळचे आमदार बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, रूपलेखा ढोरे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, आरपीआयचे पुणे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख बाळाभाई कदम, भाजपचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, शिवसेना जिल्हाप्रमुख गजाजन चिंचवडे, पिंपरी-चिंचवडचे शहरप्रमुख योगेश बाबर, रवींद्र भेगडे, बाळासाहेब जांभूळकर, शंकरराव शेलार, संतोष दाभाडे, अविनाश बवरे, शांताराम कदम, गुलाब म्हाळसकर, शिवसेना तालुकाप्रमुख राजू खांडभोर, सभापती सुरेखा कुंभार, नंदाताई सातकर, एकनाथ टिळे, ज्ञानेश्वर दळवी, भारत ठाकूर, चंद्रशेखर भोसले, बाळासाहेब घोटकुले, रामनाथ वारिंगे, माऊली शिंदे आदी उपस्थित होते. शिवतारे म्हणाले की, अजित पवार यांना पहिल्यांदा खासदारकीला निवडून देऊन 1991 मध्ये बारामतीने केलेली चूक पुन्हा मावळने करू नये, भ्रष्टाचाराचा कळस करणार्‍या व्यक्तीला निवडून दिल्याने महाराष्ट्र आम्हाला कधीही माफ करणार नाही. महाराष्ट्रात पबमध्ये नाचणारा मुलगा रथयात्रेत नाचू लागला आहे. अलिशान मोटारींमधून फिरणारा मुलगा आता बैलगाडी चालवू लागलाय. बिघडलेला मुलगा सुधारला तरी निवडणूक सार्थकी लागेल, असा टोला शिवतारे यांनी लगावला. आजोबा म्हणतात नातवाला निवडून द्या, नातू म्हणतो, आजोबांना पंतप्रधान करा. आमच्या प्रगतीत तुमची प्रगती आहे. आता तुम्हीच सांगा गेल्या 50 वर्षात कोणाची प्रगती झाली, असा सवाल करीत त्यांनी पवार कुटुंबीयावर टीका  केली. डॉ. नीलम गोर्‍हे म्हणाल्या की, मावळची जनता साधी भोळी नाही. अजित पवार यांना पिंपरी-चिंचवडमध्ये पराभूत केले. आता मावळात त्यांच्या मुलाचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. पार्थला मिसगाईड केले जात आहे. मीडियाने दखल घ्यावी यासाठीची आगतिकता केविलवाणी आहे. राष्ट्रवादीने अत्यंत अपरिपक्व नेतृत्व समोर ठेवले आहे, अशी टीका त्यांनी केली. मावळ गोळीबार प्रकरणी आघाडी सरकार निर्घृणपणे वागले. पुरावे देऊनही गोळीबाराचे समर्थन केले गेले. कोणत्या तोंडाने लेकरासाठी मते मागता, असा संतप्त सवालही त्यांनी केला. पुणे जिल्ह्यातून काँग्रेस, राष्ट्रवादी उणे करायचे आहे, असे त्या म्हणाल्या. उमेदवार श्रीरंग बारणे म्हणाले, ‘ही निवडणूक देशाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. राष्ट्रवादीचे उरण, पनवेल येथे डिपॉझिट जप्त झाले होते. कर्जतमध्ये शिवसेना आमदार आहे. मावळने सर्वात जास्त आघाडी दिली होती. चिंचवडमध्ये भाजपचा तर पिंपरीत शिवसेना आमदार आहे. संपूर्ण मतदारसंघावर युतीचे प्राबल्य आहे. त्यामुळे आपण शंभर टक्के विजयी होणार असून ते सांगायला कोणत्या ज्योतिषाची गरज नाही.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply