शास्त्रीय संगीत संमेलन साजरे
पनवेल : रामप्रहर वृत्त : पनवेल येथील पनवेल कल्चरल असोसिएशनच्या सभागृहामधे एका शास्त्रीय संगीत संमेलनाचे आयेजन करण्यात आले. प्रसिद्ध तबलावादक किशोर पांडे यांच्या संकल्पनेतून आयोजित या संगीत संमेलनामधे ज्येष्ठ आणि युवा कलाकारांच्या शास्त्रीय गायकीचा आनंद पनवेलकरांनी लुटला. आकाशवाणीच्या ज्येष्ठ गायिका अर्चना कुलकर्णी, त्याच्या शिष्या निलांबरी अनगळ, पद्मजा कुलकर्णी व स्वराली माळवदे यांच्यासह ज्येष्ठ गायक मिलिंद गोखले, संध्या घाडगे, वैशाली पाटील, मेघा इंगळे, मधुरा सोहनी, प्रतिक जेउरगी, अनिल कासरे, मुदिता सोनवणे या गायकांनी या संमेलनामधे गायन करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
या गायकांनी यमन, मुलतानी, पुरिया, बिहाग, पुरियाधनाश्री, कामोद, शंकरा, छायानट, नटकेदार, दुर्गा, मालकंस अशा विविध रागांचे सादरीकरण केले. आकाशवाणीच्या ज्येष्ठ गायिका अनिता कुलकर्णी यांच्या राग भैरवीमधील ठुमरी व तराण्याने संमेलनाची सांगता झाली. धनंजय सुगवेकर, ओजस जोशी, प्रतिभा कुलकर्णी यांनी गायकांना संवादिनीसाथ व धनंजय खुटले, विनायक प्रधान, श्रीकांत पोवळे, अजय भाटवडेकर, रमेश गोंधळेकर, किशोर पांडे यांनी तबलासाथ केली. प्रसिद्ध निवेदिका अर्चना ताह्मणकर यांनी बहारदार सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. असोसिएशनचे अध्यक्ष मोहन शिरोडकर, कार्यवाह जगन्नाथ जोशी, संगीत विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार गोगटे यांनी हे संमेलन यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
संमेलनाच्या आयोजनाबाबत माहिती देताना संयोजक व प्रसिद्ध तबलावादक किशोर पांडे म्हणाले, या संमेलनाच्या निमित्ताने विविध घराण्यांची तालीम लाभलेले जाणते आणि युवागायक एकाच व्यासपीठावर येतात. यातून रसिकांना विविध प्रकारच्या गायन व वादनशैलीची अनुभूती मिळते आणि मुख्य म्हणजे सांगीतिक देवाणघेवाण होऊन या कलाकारांची गायकी अधिक प्रगल्भ होत जाते.