Breaking News

टंचाई कामांचे वस्तुस्थितीदर्शक नियोजन करावे

मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांचे निर्देश;

जिल्ह्यात 207 गावे, पाड्यांना टँकर्सद्वारे पाणी पुरवठा

अलिबाग : जिमाका, प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी जिल्हा परिषदेने विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली असून कोणत्याही परिस्थितीत गावे आणि वाड्यांना तातडीने टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे तसेच विंधन विहिरींची कामेही त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी सोमवारी (दि. 6) दिले.

जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या संदर्भात सुरु असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी सोमवारी गट विकास अधिकारी व विभाग प्रमुखांची  बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिलकुमार ओसवाल, शीतल पुंड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दत्तात्रय पाथरूट, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा श्री वेंगुर्लेकर यांच्यासह जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी तसेच सहाय्यक विस्तार अधिकारी या आढावा बैठकीला उपस्थित होते.

विस्तार अधिकारी तसेच सहाय्यक विस्तार अधिकारी यांनी आपापल्या भागात सातत्याने पाणी टंचाईबाबत आढावा घेत राहून तसेच ग्रामस्थांच्या, नागरिकांच्या मागण्यांचा तातडीने विचार करून वस्तुस्थिती दर्शक अहवाल तयार करावेत व त्यानुसार पिण्याच्या पाण्याची उपाययोजना करावी तसेच प्रांत अधिकारी, तहसीलदार यांच्याशी समन्वय ठेवावा, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी हळदे यांनी यावेळी केल्या. अतिरक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देवऋषी यांनीही या बैठकीत मार्गदर्शन केले.

पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ ऑक्टोबर 2018 ते जून 2019 पर्यंत 540 गावे आणि 1493 पाडे अशा 2033 गावांसाठी 940 लाख रुपयांच्या टंचाई कार्यक्रमावर सध्या जिल्हा परिषदेतर्फे कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती यावेळी उपभियंता सुरेश इंगळे यांनी दिली.

23 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा

सध्या जिल्ह्यात जिथे आवश्यकता आहे, अशा 48 गावे व 159 वाड्या अशा 207 गावे आणि पाड्यांना 23 टँकर्सद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यात येत असून, सर्वाधिक प्रत्येकी 6 टँकर्स पेण, पोलादपूर आणि महाडमध्ये  सुरु आहेत. पेणमध्ये 13 गावे आणि 56 वाड्या अशा 69 गावांना, महाडमध्ये 9 गावे आणि 37 वाड्या अशा 46 गावांना तर पोलादपूरमध्ये 10 गावे आणि 36 वड्या अशा एकंदर 46 गावांना हे टँकर्स सुरु आहेत. कर्जत तालुक्यात 19 गावांसाठी 3 टँकर्स सुरु आहेत. उरण, पनवेल, खालापूर, रोहा, माणगाव, मुरुड आणि तळा या तालुक्यांत प्रत्येकी एक टँकर सुरु आहे. मागणी वाढत जाईल तसतसे टँकर्सही वाढविण्यात येत आहेत, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.

विंधन विहिरींची कामे जलदरित्या पूर्ण

ऑक्टोबरपासून जिल्ह्यात विंधन विहिरींची कामे सुरु असून मान्यता मिळालेल्या 227पैकी 40 विंधन विहिरी घेण्यात आल्या आहेत. त्यात 29 विहिरी यशस्वी झाल्या आहेत. सर्वाधिक विहिरी महाड, पोलादपूर, पेणमध्येच आहेत. याशिवाय 37 विहिरींची विशेष दुरुस्तीही मार्गी लागली असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.

जिल्ह्यातील पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी जिल्हा परिषदेने विविध उपाययोजना प्रत्यक्ष राबविण्यास सुरुवात केली आहे.  कोणत्याही परिस्थितीत टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांना तातडीने टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाईल. विंधन विहिरींची कामेही त्वरित पूर्ण केली जातील.

-दिलीप हळदे, मुख्य कार्यकारी अधिकारी,  रायगड जिल्हा परिषद

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply