चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमिवर लसीकरणाचे आवाहन
पनवेल : प्रतिनिधी
प्रतिबंधात्मक लसीकरणाला गती देण्यासाठी हर घर दस्तक 2मोहिमेची सुरुवात पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर व आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. ही मोहीम 1 जून ते 31 जुलैदरम्यान पनवेल महापालिका क्षेत्रात राबविली जाणार आहे.
या मोहिमेअंतर्गत आशावर्कर आणि एएनएम घरोघरी जाऊन 12 ते 14, 15 ते 17 वयोगटातील मुलांमुलींचे लसीकरण, 60 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण, दुसरा डोस पूर्ण झालेल्या किंवा काही कारणाने राहिलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण केले जात आहे.
केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार पालिका क्षेत्रात हर घर दस्तक 2ची सुरुवात करण्यात आली असून, घराजवळील लसीकरण केंद्रावरती जाऊन लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोविडच्या चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बुस्टर डोस घेण्याविषयीचे आवाहनही या मोहिमेअंतर्गत करण्यात येत आहे.
चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वारंवार हात धुणे, मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर या कोरोनाच्या त्रिसूत्रीचे नागरिकांनी पालन तसेच लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी केले आहे.