कडकडीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
खोपोली ः प्रतिनिधी – महाभयानक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशस्तरावर लॉकडाऊन व राज्यात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. खोपोली शहर व परिसरात अद्याप एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला नाही हा एक प्रकारचा दिलासाच आहे, मात्र लॉकडाऊन व कर्फ्यू असूनही काही नागरिक, तरुण शहरात रस्ते व अन्य ठिकाणी विनाकारण गर्दी करतात. याबरोबरच मुंबई व पुण्यातूनही काही नागरिक शहरात दाखल झाले आहेत. यातून भविष्यात खोपोलीतही कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. हे संभाव्य संक्रमण व धोका रोखण्यासाठी खोपोलीतील सर्व घटकांनी एकत्रितपणे पुकारलेल्या दोन दिवसांच्या जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नागरिकांची वर्दळ व एकमेकांचा संपर्क शून्य स्तरावर आणून कोरोना संक्रमण करणारी साखळी प्रभावीपणे तोडण्यासाठी खोपोलीकरांनी स्वयंस्फूर्तीने दिनांक 31 मार्च व 1 एप्रिल असे दोन दिवस जनता कर्फ्यूचे आयोजन केले आहे. या दोन दिवसांत मेडिकल स्टोअर्स व दवाखाने वगळता शहरातील सर्व आस्थापने व दुकाने, भाजीपाला, मटण मासळी बाजार व वाहनांची रहदारी थांबवली आहे. या उपक्रमाला शहरातील सर्व व्यापारी व सर्व स्तरातील नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाल्याने मंगळवारी (दि. 31) खोपोलीत कडकडीत बंद पाळण्यात आला. बुधवारीही अशीच स्थिती राहणार आहे. यादरम्यान नगरपालिका हद्दीतील सर्व हातावर पोट असणार्या कुटुंबांना व रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना मोफत दोन वेळचे जेवण व चहापाण्याची सुविधा येथील पोलीस, नगरपालिका प्रशासन तसेच सहज सेवा फाऊंडेशन व टेंबे स्वामी मठाच्या माध्यमातून केली गेली आहे.
खोपोलीतील सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधी, व्यापारी, भाजी-फळे व मटण, मासळी विक्रेते तसेच अन्य सार्वजनिक सेवा देणार्या संघटनांनी समस्येची गांभीर्याने दखल घेत दोन दिवस जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. त्याला सर्वसामान्य जनतेने सहभागी होऊन प्रतिसाद दिला आहे.
अशाच प्रकारे दोन दिवसांचा जनता कर्फ्यू खालापूर नगर पंचायत क्षेत्रातही जनतेच्या सहभागाने पुकारण्यात आला. तसेच तालुक्यातील अन्य ग्रामपंचायत हद्दीतही दोन दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्यामुळे मंगळवारी संपूर्ण तालुक्यात शंभर टक्के सर्व व्यवहार बंद राहिले.
खोपोलीकरांनी दोन दिवस जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. त्याला सर्वांनी पाठिंबा दर्शविला असून, मंगळवारी याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. खोपोली नगरपालिका क्षेत्रात संपूर्णपणे कडकडीत बंद राहून एकही नागरिक घराबाहेर पडला नाही. कोरोनाला हरविण्यासाठी ही लढाई या माध्यमातून यशस्वी होणार आहे.
-सुमन औसरमल, नगराध्यक्षा, खोपोली
खोपोलीतील कोरोनाचा संभाव्य फैलाव रोखण्यासाठी हे एक सकारात्मक पाऊल आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी दोन दिवसांच्या जनता कर्फ्यूत सर्व व्यापारी स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले आहेत.
-राजेंद्र फक्के, ज्येष्ठ सल्लागार, व्यापारी संघटना, खोपोली