Breaking News

प्रवक्त्यांची मुक्ताफळे

टीव्ही कॅमेरे दिसताच अद्वातद्वा मुक्ताफळे उधळणारे राजकीय पक्षांचे प्रवक्ते आता डझनांनी सापडतील. ही सारी प्रसिद्धी आपल्याला पक्षाच्या ध्येयधोरणांमुळे आणि पक्षाच्या सोयीसाठीच मिळत आहे याचे भान प्रवक्तेपद मिरवणारे हे नेते विसरतात. पक्षाची बाजू लावून धरण्याच्या नादात वाट्टेल ते बरळू लागतात. त्यांच्या या मुक्ताफळांचा पक्षाशी काहीही संबंध नसतो. तरीही प्रवक्त्यांच्या प्रमादांचे परिणाम पक्षालाच भोगावे लागतात. हे सर्वच राजकीय पक्षांच्या बाबत घडताना दिसते. एखाद्या राजकीय पक्षाचा प्रवक्ता पक्षाचीच विचारधारा जगासमोर मांडेल अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण आणि पक्षांतर्गत संवाद याचा लाभ प्रवक्त्यांना होत असतो. नजीकच्याच भूतकाळात वृत्तवाहिन्यांवरील चर्चा-परिसंवादांमध्ये भाग घेण्यासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांना रोजच्या रोज निमंत्रणे जाऊ लागली आणि यामुळे राजकीय पक्षांना विशेषत: वृत्तवाहिन्यांवरील या चर्चा-परिसंवादांतून बोलण्याकरिता प्रवक्तेपदी कुणाची तरी नेमणूक करणे आवश्यक बनले. या प्रवक्त्यांना या न त्या निमित्ताने सतत प्रसिद्धी माध्यमांच्या झोतात राहता येऊ लागले व त्याचा विपरित परिणाम देखील आजवर अनेकदा पाहायला मिळाला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते गेल्या काही वर्षांत तर आपले स्वत्वच गमावून बसलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उदयानंतर काँग्रेस प्रवक्त्यांचा प्रतिसाद निव्वळ प्रतिक्रियाशील राहिला आहे. अर्थात पराभूत वृत्तीचे त्यांचे ज्येष्ठ नेते अशी बाष्कळ टीका करतात की प्रवक्त्यांना आपल्या नेत्याचा बचाव करण्यापलिकडे काही काम उरत नाही. शिवसेनेचे प्रवक्ते तर रोजच सकाळी नऊ-साडेनऊ झाले की रेडिओ चालू केल्याप्रमाणे काही ना काही तरी भाष्य टीव्ही पत्रकारांसमोर येऊन करतात. त्याला कधी कधी ना शेंडा असतो ना बुडखा. संधी मिळताक्षणी भारतीय जनता पक्षावर तोंडसुख घेणे या पलीकडे त्यांना काही कार्यक्रमच उरलेला नाही. परंतु प्रवक्त्यांच्या आगाऊपणाचा प्रसाद नुकताच सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मिळाला ही चिंतेची बाब आहे. साहजिकच भाजपला कोंडीत पकडण्याची संधी विरोधकांनी गमावली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे काम इतके निष्कलंक आणि जोमाने सुरू आहे की अशा प्रकारची संधी विरोधकांना गेल्या आठ वर्षांत मिळाली नव्हती. मोहंमद पैगंबर यांच्याबद्दल एका टीव्ही चर्चेच्या वेळी भाजप प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी काही आक्षेपार्ह विधान केले. पक्षाचे आणखी एक प्रवक्ते नवीनकुमार जिंदाल यांनीही अशाच प्रकारे मर्यादा ओलांडून टीका केली. कडक शिस्तीचे दंडक पाळणार्‍या भाजपने या दोघांनाही ताबडतोब बाहेरचा रस्ता दाखवला आहे. अन्य धर्मीयांवर किंवा अन्य धर्मांच्या श्रद्धास्थानांवर टीकेचे आघात करणे ही भाजपची संस्कृती नाही. भाजप सोडा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्तीतही हे वर्तन बिलकुल बसत नाही. समाजमाध्यमांवर अनेकदा बाष्कळ टीका चालू असते. अन्य पक्षांचे प्रवक्तेही जाणूनबुजून श्रद्धास्थानांचे अपमान करत असतात. प्रसंगी ही टीकाटिप्पणी शिवराळ होताना दिसते. तरीही भाजपचे नेते आणि प्रवक्ते यांनी कधीही आपली मर्यादा सोडली नाही. त्यामुळेच या ताज्या प्रकाराची गंभीर दखल घेऊन भाजपच्या श्रेष्ठींनी ताबडतोब कारवाई करत नवीन जिंदाल यांना पदावरून नव्हे तर पक्षातूनच काढून टाकले आणि नूपुर शर्मा यांचे प्राथमिक सदस्यत्व निलंबित करण्यात आले. अशा प्रकारची कारवाई करण्याचे धाडस अन्य कुठला पक्ष करेल का?

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply