Breaking News

नेरळ-माथेरान घाटात रिक्षांची अवैध वाहतूक

कर्जत : बातमीदार

नेरळ-माथेरान घाटरस्त्यावर जाण्यास अवजड आणि तीनचाकी वाहनांना बंदी आहे. मात्र बाहेरील तीनचाकी रिक्षाचालक हे आपली वाहने जुम्मापट्टी येथे जाण्याचे कारण देऊन माथेरान घाट पार करतात. घाटातून ये ये जा करताना तीनचाकी वाहनांना अनेकदा अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, माथेरान घाटात तीनचाकी वाहने नेणार्‍या चालकांवर कारवाई करावी. अशी मागणी जोर धरत आहे. माथेरान या पर्यटनस्थळी जाण्यासाठी नेरळ-माथेरान या घाटरस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यातही सात किलोमीटर लांबीचा नेरळ-दस्तुरी हा घाटरस्ता वाहनचालकांसाठी अवघड समजला जातो आणि त्यामुळे आजही टेम्पो ट्रॅव्हलरसारख्या प्रवासी वाहनांना या घाटात वाहतूक करण्यास परवानगी दिली जात नाही. मात्र या घाटरस्त्याचा काही भाग रुंद बनविण्यात आल्यानंतर या रस्त्यावरून नेरळ येथील हुतात्मा चौकात स्थानिकांची नजर चुकवून काही अवजड वाहने आणि तीनचाकी रिक्षा वाहतूक करीत असल्याचे दिसून आले आहे. त्यात तीनचाकी रिक्षांसाठी हा घाटरस्ता अवघड असाच रस्ता आहे. तरीदेखील प्रवासी रिक्षांचे चालक हे आपली वाहने माथेरान घाटात नेत असल्याचे दिसून आले आहे. मात्र गेल्या दोन महिन्यात तब्बल तीन रिक्षा या घाटरस्त्याच्या खाली दरीत कोसळल्या आहेत. मात्र सुदैवाने त्यात जीवितहानी झालेली नाही. बंदी असतानाही माथेरान घाटरस्त्यावर तीनचाकी   रिक्षा कशा नेल्या जातात असा सवाल नेरळ-माथेरान टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र कराळे यांनी उपस्थित केला आहे. घाटात एखादा अपघात झाला की, त्यानंतर अनेक प्रश्न निर्माण होतात, मात्र अपघात झाल्यानंतर घाटरस्त्यातील वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी आमच्या टॅक्सी चालकांवर असते. त्यामुळे अशा घटना होणार नाहीत, यासाठी घाटरस्त्याने जाण्यास कोणत्या वाहनाना बंदी आहे, याबाबत माहिती देणारे पत्रक पोलीस प्रशासनाने काढावे, अशी आमची मागणी असून चुकीची वाहने घाटात जाऊन वाहतुकीवर परिणाम करणार असतील तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी नेरळ-माथेरान टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र कराळे यांनी केली आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply