Breaking News

सीकेटी महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त

छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला. या दिनाचे महत्त्व महाविद्यालयीन युवक-युवतींना पटवून देण्याकरिता जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सांस्कृतिक विभाग, राष्ट्रीय कॅडेट कॉप्स यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. 6) महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन दिमाखात साजरा करण्यात आला. सुरुवातीला पनवेल मुख्य शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पनवेल शहर ते महाविद्यालयीन संकुल अशी शिवज्योत रॅली काढण्यात आली. त्यावेळी महाविद्यालयातील युवक-युवतींच्या जय भवानी-जय शिवाजी या घोषणांनी परिसर दुमदुमला. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील यांनी शिव-स्वराज्य दिनाचे महत्त्व सांगितले. याबरोबरच विद्यार्थ्यांना शिवचरित्र वाचुन त्याचा अंगीकार करण्याचा संदेश दिला. सांस्कृतिक विभागाच्या विद्यार्थी-विद्यार्थीनी महाराष्ट्रगीत आणि पोवाडा सादर करून सर्वींना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अभिनेता-दिग्दर्शक राहुल वैद्य यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कशापद्धत्तीने झाला त्याचे वर्णन त्यांच्या शिवकाव्य ह्या नवीन पुस्तकामार्फत सांगितले. अंततः इंग्रजी विभागप्रमुख तथा सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष डॉ. आर. व्ही. येवले यांनी उपस्थितांचे आभार मानले व सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी प्रा. आकाश पाटील यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयाच्या अंतर्गत हमी कक्षाचे समन्वयक डॉ. बी. डी. आघाव, विज्ञानशाखाधिपती डॉ. ज्योस्त्ना ठाकूर, रुसा समन्वयक डॉ. एस. एन. वाजेकर, प्राणीशास्त्र विभागाच्या प्रमुख व विद्यार्थी परिषद तथा विद्यार्थी कल्याण कक्षाच्या अध्यक्षा डॉ. एम. ए. म्हात्रे, भुगोल विभागाचे प्रमुख डॉ.डी. एस. नारखेडे, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. निलेश वडनेरे, ग्रंथपाल रमाकांत नवघरे आदी प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. सुर्यकांत परकाळे, एन. सी. सी. विभागाचे प्रमुख प्रो. डॉ. यु. टी. भंडारे, सि.टी.ओ. प्रा. नीलिमा तिदार, सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष डॉ. आर. व्ही. येवले, सांस्कृतिक समन्वयक प्रा. गणेश जगताप, कार्यक्रम अधिकारी प्रा. आकाश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. शिवस्वराज्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे दिमाखात व उत्साहात आयोजन केल्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थ्येचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय.टी.देशमुख, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply