14 कोटींची तरतूद; सरपंच मंगेश शेलार यांच्या पाठपुराव्याला यश
पनवेल ः रामप्रहर वृत्त
करंजाडे वसाहतीमधील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या संदर्भात सरपंच मंगेश शेलार यांनी आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केल्याने याकरीता 14 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. लवकरच निविदा प्रसिद्ध होऊन त्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि पाऊस संपल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे करंजाडेतील नागरिकांची आता खड्डेमय रस्त्यांतून सुटका होणार आहे.
साडेबारा टक्के भूखंड योजनेवर करंजाडे वसाहत विकसित करण्यात आली आहे. या ठिकाणी 1 ते 6 सेक्टरमध्ये लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. अंतर्गत रस्ते प्रशस्त असले तरी त्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे सिडकोने दुर्लक्ष केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे रस्त्यावर पडले आहेत. गेल्या महिन्यात मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे तर येथील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहने त्यामध्ये आपटत आहेत. त्यामुळे लहान-मोठे अपघात होत आहेतच त्याचबरोबर वाहनांचे नुकसान होतेय.
या वसाहतीतील रस्ते सुस्थितीत असावेत या उद्देशाने सरपंच मंगेश शेलार गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. भाजपचे मावळ लोकसभा मतदारसंघ प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रव्यवहार करण्याबरोबरच सातत्याने बैठका घेण्यात आल्या. त्यानुसार सिडकोने सर्व सहा सेक्टरमधील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात आराखडा तयार करण्यात आला असून 14 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण करून एजन्सी नियुक्त केली जाणार आहे. आमदार महेश बालदी यांनी सरपंच शेलार यांनी केलेल्या पाठपुराव्याचे कौतुक केले. सुरुवातीला पावसाळ्यामध्ये नियुक्त केलेल्या ठेकेदाराच्या माध्यमातून पॅचवर्क करण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे बालदी यांनी सांगितले. पावसाळ्यानंतर सर्व रस्ते सुस्थितीत नक्कीच दिसतील असा विश्वासही
त्यांनी व्यक्त केला.
करंजाडे वसाहतीतील रस्त्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे या अगोदर फारसे लक्ष दिले गेले नाही. या परिसराचा प्रथम नागरिक म्हणून आपण दोन्ही आमदारांच्या माध्यमातून सिडकोकडे पाठपुरावा केला. त्यानुसार 14 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. लवकरच या कामांच्या निविदा काढण्यात येणार आहेत.
-मंगेश शेलार, सरपंच करंजाडे