अन्यथा उपोषण करणार, हरिदास बाणकोटकर यांचा इशारा
मुरुड : प्रतिनिधी
शासनाने बंदी घातली असतानाही समुद्रात मासेमारी करणार्या मच्छिमारांवर येत्या दोन दिवसात कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा राजापुरी येथील ग्रामस्थ हरिदास बाणकोटकर यांनी मुरूड तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे.
माशांचा प्रजननकाळ असल्यामुळे शासनाने 1 जून ते 31 जुलै या कालावधीत खोल समुद्रात मासेमारी करण्यास बंदी घातली आहे. परंतु राजपुरी कोळीवाड्यातील काही मच्छिमारांनी 3 जून 2022 रोजी समुद्रात बोटी नेऊन मोठ्या प्रमाणात मासेमारी केली. त्याबाबतचे मोबाइल चित्रीकरण व फोटोही प्रसारीत झाले आहेत. मात्र मुरूड तालुका मत्स्यविकास व परवाना अधिकारी तुषार वाळुंज यांनी अद्यापर्यंत मासेमारी करणार्या बोटींवर कायदेशीर कारवाई केलेली नाही. येत्या दोन दिवसात मासेमारी करणार्या होड्यांच्या मालकांवर कारवाई झाली नाही तर तहसील कार्याल्यासमोर उपोषण सुरु करणार आहे, असे हरिदास बाणकोटकर यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाची प्रत मत्स्यविकास अधिकार्यांनाही दिली आहे.
मुरूड मत्स्यविकास अधिकारी हे कार्यालयात भेटत नाहीत. ते नेमक्याच दिवशी हजर असतात. त्यामुळे बंदी असतानाही मासेमारी जोरात सुरू आहे. त्याला मत्स्यविकास अधिकारी जबाबदार असून शासनाने त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणीही हरिदास बाणकोटकर यांनी केली आहे.