पाली : रामप्रहर वृत्त
परतीच्या वादळी पावसामुळे सुधागड तालुक्यातील भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापणीसाठी तयार झालेले भाताचे पीक मातीमोल झाले, मात्र मागणी करूनही या नुकसानीचे अजूनही पंचनामे केले गेले नसल्याचा आरोप तालुक्यातील शेतकर्यांनी केला आहे. सुधागड तालुक्यात या वर्षी मोठ्या प्रमाणात भाताची लागवड करण्यात आली होती. समाधानकारक पाऊस झाल्याने पीकही जोमात होते. काही भागात तर भात कापणीला सुरुवातही झाली होती, मात्र परतीच्या पावसाने शेतातील उभे भाताचे पीक भुईसपाट झाले, तर कापलेले पीक कुजण्यास सुरुवात झाली आहे. तालुक्यातील वाघोशी ग्रामपंचायत हद्दीतील शेतीची परतीच्या पावसाने दैनाच झाली आहे. पेरणीसाठी उसनवारीने घेतलेल्या बी-बियाण्यांचे पैसेही निघणे मुश्कील झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरीराजा रडकुंडीस आला आहे. मागणी करूनही सुधागड तालुक्यात अजूनही शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली नसल्याचा आरोप येथील शेतकरी करीत आहेत.
तालुक्यात परतीच्या पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी यासाठी तहसीलदारांना निवेदन देऊन आठ दिवस झाले, मात्र अद्याप भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत.
– हभप गणेशबुवा देशमुख, पाली, ता. सुधागड