Breaking News

कर्जत तालुक्यातील नऊ गावे पूरग्रस्त, तीन गावे दरडग्रस्त

 आपत्ती आराखडा तयार, प्रशासनाकडून नियोजन

कर्जत : बातमीदार

पुर्वानुभवानुसार नऊ गावे पूरग्रस्त आणि तीन गावे दरडग्रस्त आहेत, असे गृहीत धरून कर्जत तालुका आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला असून, प्रशासनाने संभाव्य आपत्तीवर मात करण्याचे नियोजन केले आहे.

कर्जत तालुक्यात दरवर्षी सुमारे 3500 मिलीमीटर पाऊस होत असतो. गेली काही वर्षे पावसाळ्यात सातत्याने पूर येऊन काही गावांमध्ये नदीचे पाणी धुसते. व घरातील सामानांचे मोठे नुकसान होत असते. तर डोंगर उतारावर किंवा पायथ्याशी घरे असलेल्या कुटुंबांना दरडीचा धोका निर्माण होतो. ते लक्षात घेऊन प्रशासनाने कर्जत तालुका संभाव्य आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात तालुक्यातील कर्जत शहर, दहिवली, नसरापूर, आकुर्ले, कळंबोली, मालवाडी, एकसळ आणि वावे या गावांचा पूरग्रस्त गावे म्हणून समावेश करण्यात आला आहे. या गावांत यावर्षी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यास तेथील ग्रामस्थांंची व्यवस्था समाजमंदिरात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तर कर्जत शहरातील आकुर्ले, दहिवली आणि बाजारपेठ भागात महापूर आल्यास त्या भागातील नागरिकांची तात्पुरती निवारा व्यवस्था रॉयल गार्डन हॉटेल येथे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

कर्जत तालुक्यात तीन गावे दरडीच्या छायेत आहेत.डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या खांडपे ग्रामपंचायत हद्दीतील सांगवी, कर्जत शहरातील मुद्रे आणि आसल ग्रामपंचायत हद्दीतील पाली-भूतीवली गावांचा समावेश दरडग्रस्त गावांच्या यादीत करण्यात आला आहे. संततधार पाऊस असल्यास सांगवी ग्रामस्थांची राहण्याची व्यवस्था  विठ्ठल रखुमाई मंदिरात तर कर्जत मुद्रे येथील रहिवाशांची  तात्पुरती व्यवस्था रॉयल गार्डन हॉटेलमध्ये आणि पाली भूतीवली ग्रामस्थांची राहण्याची व्यवस्था डिकसळ गावातील शाळेत करण्यात येणार आहे.

कर्जत तालुक्यातील डोंगरपाडा येथील पाझर तलाव आठ वर्षांपूर्वी पावसाळ्यात फुटून मोठे नुकसान झाले होते. तालुक्यातील पाथरज, खांडस, खांडपे, कशेळे, साळोख येथील पाझर तलाव किमान तीन वर्षापूर्वीचे आहेत. त्यांचे मातीचे बांध फुटून कोणताही अपघात होऊ नये, यासाठी सर्व पाझर तलाव आणि अवसरे तसेच पाली-भूतीवली येथील धरणांच्या सद्यस्थितीची पाहणी आपत्ती व्यवस्थापनामधील अभियंत्यांकडून करण्यात आली आहे, अशी माहिती कर्जत तहसील कार्यालयाने दिली.

आगामी पावसाळ्यात पूर आणि दरडी कोसळण्याची संभाव्य भीती लक्षात घेऊन नियोजन केले आहे. त्यात  हवाई मदत आवश्यक असल्यास कर्जत येथे हेलिपॅड तयार ठेवण्यात येणार आहे. माथेरानमध्येदेखील हेलिकॅप्टर उतरवण्याची व्यवस्था असेल.

-विक्रम देशमुख, तहसीलदार, कर्जत

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply