Breaking News

पुन्हा एकदा रणकंदन

राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर आठवड्याभरावर येऊन ठेपलेली विधान परिषदेच्या दहा जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न तरी करेल असे वाटले होते, परंतु अंतिमत: महाविकास आघाडीने सहा उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. भाजपच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवू पाहणार्या सदाभाऊ खोत यांनी अखेरच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तेवढा विवेक महाविकास आघाडीने दाखवला असता तर बरे झाले असते.

आता विधान परिषदेच्या दहा जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात आहेत. याचा अर्थ पुन्हा एकदा राज्यसभेसारखाच फटका खाण्याची हौस सत्ताधार्यांना आली आहे असेच म्हणावे लागेल. राज्यसभेसाठीच्या निवडणुका गेल्याच आठवड्यात पार पडल्या. राज्यसभा किंवा विधान परिषदेच्या निवडणुका या बव्हंशी गणितीय पद्धतीने पार पडतात. अशाच गणिताच्या पेपरात शिवसेनेला नुकताच भोपळा मिळाला. या निवडणुकीमध्ये नेमके कुठे चुकले याचाच अंदाज महाविकास आघाडीच्या नेत्यांना अजुन आलेला नाही. तेवढ्यात विधान परिषदेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत, आणि त्या बिनविरोध होणार नाहीत हे देखील आता स्पष्ट झाले आहे. म्हणजेच पुन्हा एकदा गणिताचा अवघड पेपर सोडवण्याची वेळ सत्ताधार्यांवर येणार! राज्य सभा निवडणुकीत मतदान खुल्या पद्धतीने झाले. आपल्या पक्षाच्या प्रतोदाला मत दाखवण्याची मुभा त्या निवडणुकीत होती. विधान परिषदेची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने पार पडते. त्यामुळे या गणितांसाठी ताळा जमवण्याचे आव्हान महाविकास आघाडीपुढे पुन्हा एकदा उभे ठाकले आहे. राज्यसभा निवडणुकीत सत्ताधार्यांना उघड उघड धोबीपछाड देणारे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीच सत्ताधार्यांना सामना करावा लागणार आहे. फडणवीस यांची गणितीय बुद्धी किती कुशाग्र आहे याची चुणुक नुकतीच पहायला मिळाली. आणि महाविकास आघाडीचे नेते कुठल्या विषयात ‘ढ’ आहेत आणि कुठल्या विषयांमध्ये पारंगत आहेत हे गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेच आहे. त्यामुळे निकाल काय लागणार याचा अंदाज एखाद्याला सहज करता येईल. भाजपपुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी एक पाऊल पुढे टाकले. तसा उमदेपणा महाविकास आघाडीने दाखवला असता तर अंकगणिताची प्रश्नपत्रिका सोडवण्याचे संकट देखील ओढवले नसते. परंतु अशा उमदेपणाची अपेक्षा सत्तेला चिकटलेल्या नेतेमंडळींकडून कशी करावी? गेल्या आठवड्यातील निवडणुकीत हेच महाविकास आघाडीचे नेते भाजपवर घोडेबाजाराचे आरोप करत होते. अपक्षांवर दगाबाजीचा ठपका ठेवत होते. जेव्हा उमेदवारी मागे घेण्याची वेळ आली तेव्हा मात्र ते मूग गिळून गप्प बसले. येत्या आठवड्याभरात होणार्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सहा उमेदवारांपैकी एकाला तरी घरी बसवण्याचा करेक्ट कार्यक्रम फडणवीस यांच्या धडाकेबाज टीमला पुन्हा एकदा पार पाडावा लागणार आहे. हा एक उमेदवार कोण असेल याबद्दल उत्सुकता ताणली गेली आहे. ते जळगावचे एकनाथ खडसे असू शकतील किंवा नंदुरबारचे आदिवासी उमेदवार अमश्या पाडवी असू शकतील. किंवा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का देण्यासाठी भाई जगताप यांचाही कार्यक्रम होऊ शकतो. निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही. परंतु त्या निमित्ताने राजकारणाची पातळी घसरू देऊ नये एवढी मात्र कळकळीची विनंती नेते मंडळींना आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply