
-आमदार प्रशांत ठाकूर
लोकांची फसवणूक आणि लुबाडणूक करणारा शेतकरी कामगार पक्ष यापुढील निवडणुका कशाच्या आधारावर लढणार? आणि पुन्हा अशा पद्धतीची संधी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अथवा अन्य बँकांमध्ये मिळाल्यास तिथे शेकाप लोकांची पुन्हा फसवणूक तर करणार नाही ना याची खात्री शेकापतर्फे देण्यात येईल का याचे उत्तर आज सर्वसामान्य जनतेला हवे आहे.
कर्नाळा बँकेच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीने अटक करून आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या संपूर्ण वर्षभरात शेतकरी कामगार पक्षाचे सर्व पुढारी, ‘साहेब लवकरच बाहेर येतील’, असा भरवसा आपल्या कार्यकर्त्यांना देत होते, मात्र विवेक पाटील यांनी सहकार खात्याला वरचेवर दिलेल्या जबाबामध्ये आणि कोर्टापुढेही वारंवार सर्व आरोप मान्य केल्यामुळे त्यांना जामीन मिळू शकलेला नाही.
या संपूर्ण वर्षभरात एका बाजूला विवेक पाटील यांच्याकडून जामिनासाठी न्यायालयात सुनावणी सुरू होती, पण याच काळात राज्य सरकारचे सहकार खाते, महाराष्ट्र पोलीस यांनी बँकेच्या घोटाळ्यातील एकाही आरोपीला अद्यापही अटक केलेली नाही. या पार्श्वभूमीवर असा प्रश्न पडतो की, महाराष्ट्र सरकारने, सहकार खात्याने आणि पोलीस खात्याने आपल्या अंतर्गत येणार्या बँकांमधील घोटाळ्यासंदर्भात इतकी उदासिनता दाखवणे योग्य आहे का?
एक हनुमान चालिसा वाचायची नुसती घोषणा केली, तर राज्यातील एक खासदार आणि एक आमदार 12 दिवस तुरुंगात जातात, पण 528 कोटी रुपयांचा घोटाळा करून गरीबांचे पैसे हडप करणार्यांवर मात्र राज्य सरकार कोणतीही कारवाई करत नाही हे कशाचे लक्षण आहे? यावरूनच या सरकारची नीतिमत्ता काय आहे ते स्पष्ट होत नाही का?
गेली अनेक वर्षे शेतकर्यांचा कैवार घेणारा आणि शेतकरी, कामगारांच्या अडचणी व समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभा राहाणार्या शेतकरी कामगार पक्षाने आज मात्र कर्नाळा बँक घोटाळ्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी, कामगार खातेदारांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी हा घोटाळा घडवणारे आणि पैसे हडप करणारे शेकापचेच माजी आमदार विवेक पाटील यांना वाचविण्यासाठी शरणागती पत्करून राज्य सरकारला पाठिंबा देण्याची भूमिका का स्वीकारली?
याचबरोबर नवी मुंबईच्या विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या नावाऐवजी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याच्या मुद्द्याला शेकाप गुमान पाठिंबा देतो. त्यासाठी स्थानिकांसह आसपासच्या लाखो नागरिकांचा विरोधही शेकाप पत्करतो. याचेही गमक या सर्व घोटाळ्यात आहे हे स्पष्ट दिसते. विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी पेटलेल्या आंदोलनाला शेकाप विरोध का करतो?
जो शेतकरी कामगार पक्ष गेली अनेक वर्षे रायगड जिल्ह्यात शेतकर्यांच्या समर्थनासाठी मोर्चे काढणे आणि आंदोलन करणे ही भूमिका घेत होता, विधिमंडळामध्ये राज्य सरकारवर आणि निरनिराळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तारूढ पक्षावर गंभीर स्वरूपाचे आरोप करीत होता आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक व्हावे म्हणून प्रसंगी रस्त्यावर उतरून प्रोत्साहित करत होता त्या शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील आज एक वर्ष तुरुंगात आहेत. यामुळे सामान्य बँक ग्राहक, खातेदार, शेकापचा सामान्य कार्यकर्ता यांची शेकापच्या नेत्यांनी माफी मागावी असे वाटत नाही का? ज्या जनतेने त्यांच्यावर विश्वास टाकून कर्नाळा बँकेमध्ये खाती उघडली, आकर्षक दराच्या मुदत ठेवीत पैसे गुंतवले त्या सर्व जनतेला, ‘जा देत नाही पैसे‘, असे गुर्मीत विवेक पाटील म्हणत असतानाही मूग गिळून गप्प बसणार्या शेकापच्या नेत्यांचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे.
लोकांची फसवणूक व लुबाडणूक करणारा शेतकरी कामगार पक्ष निवडणुका कशाच्या आधारावर लढणार आणि पुन्हा अशा पद्धतीची संधी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अथवा अन्य बँकांमध्ये मिळाल्यास तिथे शेकाप लोकांची फसवणूक करणार नाही याची खात्री शेकाप लोकांना कशी देणार याचे उत्तर आज सर्वसामान्य जनतेला हवे आहे.
आपल्या मुलाला तुरुंगात जाण्यापासून वाचविण्यासाठी आणि आपली बेनामी संपत्ती उघडकीस येऊ नये यासाठी विवेक पाटलांनी सर्व आरोप आपल्या अंगावर घेतले आहेत. त्यांना ठाऊक आहे की, ईडीमार्फत होणार्या या सर्व कारवाईत जास्तीत जास्त सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. बँकेच्या लाटलेल्या पैशातून मोठ्या रकमेची फी घेणार्या वकिलांमार्फत आपण लवकर बाहेर पडू किंवा फार फार तर छगन भुजबळ यांसारखे बाहेर आल्यानंतर पुन्हा राजकीय जीवनामध्ये ‘मी नाही त्यातला’ या पद्धतीने उजळ माथ्याने जनतेमध्ये तसेच सामाजिक जीवनामध्ये वावरू, असा विश्वास विवेक पाटील यांना वाटत असावा.
विवेक पाटील यांनी सर्व 97 (बोगस) कर्जे ज्यांच्या नावावर उचलली त्या सर्व कर्जदारांनी, ‘होय, विवेक पाटील यांनी आमच्या नावावर कर्ज (खोटे) उचलले याची आम्हाला माहिती आहे आणि ते त्या सर्व रकमेचा उदात्त कार्यासाठी वापर करणार आहेत‘, असा जवाब संबंधित यंत्रणांकडे दिला आहे. त्या-त्या कर्जदारांना म्हणजेच शेकापचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळाली पाहिजे ही भाजपने मागणी केली आहे. या मागणीनंतरही पोलीस कारवाई करीत नसताना ईडीने जर या सर्व लुटीसाठी जबाबदार असलेल्या विवेक पाटील नावाच्या भामट्याला अटक केल्यावर भाजपने फटाके वाजवू नये, तर काय शेकापसारखे पैशाच्या गादीवर लोळत गप्प झोपून राहावे?
या सर्व घोटाळ्यासंदर्भात भाजपने ईडीकडे तक्रार दाखल केली नसती, तर या घोटाळ्यातील आरोपी विवेक पाटील हे स्वतःहून ईडीला अथवा सक्षम यंत्रणेला शरण गेले असते का? आज केंद्रीय यंत्रणेमुळे महाराष्ट्रातले घोटाळे उघडकीस येत आहेत. महाराष्ट्रातल्या जनतेला काही अंशी दिलासा मिळतोय हे सत्य नाकारता येईल का?
शेकापने गेली अनेक वर्षे रायगड जिल्ह्यात विविध नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, अर्बन बँक या ठिकाणी सत्ता उपभोगली आहे. या सत्तेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना विकासकामे कंत्राटे म्हणून देणे आणि त्या कंत्राटातून मिळालेल्या निधीतून पक्षाची वाढ करणे हे सूत्र वापरले आहे. या विरोधात बोलण्याचा ज्या नेत्यांनी प्रयत्न केला त्या-त्या नेत्यांना सातत्याने खड्यासारखे शेकापतून बाजूला काढले. शेकापची ओठात एक आणि पोटात एक ही भूमिका सर्वसामान्य जनतेच्याही लक्षात आल्यामुळे आता ही जनता शेकापपासून दूर जात चालली आहे.
मोठ्या विश्वासाने पनवेल-उरणच्या जनतेने आमदार म्हणून विवेक पाटील यांना सामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी विधिमंडळात पाठवून दिले होते, मात्र प्रत्यक्षात विवेक पाटील यांनी सामान्य माणसाच्या विश्वासाला तडा दिला. लोकांच्या कल्याणासाठी कर्नाळा बँक स्थापन केल्याचा आव विवेक पाटील यांनी आणला. शेकापसह हजारो कार्यकर्त्यांनी आपली आयुष्यभरी आर्थिक पुंजी बँकेत जमा केली. लोकांच्या या पैशांचा वापर मात्र विवेक पाटील यांनी निवडणुका लढण्यासाठी केला. काही पैशाचा वापर त्यांच्या संस्था, अकॅडमी, व्यवसाय यासाठीही मन मानेल तसा केला. काही अवधीतच विवेक पाटील यांच्या अविवेकी कृत्याचे भांडे फुटले. शेकापचे नेते, कार्यकर्ते यांना जबर धक्का बसला.
किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने केलेल्या आंदोलनावर शेतकरी कामगार पक्षाने विविध प्रकारचे आरोप केले. मे 2019पासून जवळपास 2021 सालापर्यंत कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांसाठी आंदोलन केले. यापूर्वी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जिथे जिथे सत्ता आहे त्या सर्व ठिकाणी भ्रष्टाचारविरहित कारभार करूनदेखील शेकापने या सर्व कारभाराला आरोपांच्या पिंजर्यात उभे करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यावर जमेल तेव्हा संधीसाधूपणाचा आरोप करताना ‘गद्दार’ हा शब्द सतत वापरणार्या शेकापने विवेक पाटील यांनी सर्वसामान्य जनतेशी केलेली गद्दारी मात्र शेकापच्या लक्षात आली नाही का? या गद्दारीची शिक्षा विवेक पाटील यांना मिळाली, असे सर्वसामान्य जनतेला वाटत आहे का? याचे उत्तर शेकाप शोधणार का?
RamPrahar – The Panvel Daily Paper