Breaking News

कांदळवन संरक्षणाच्या नावाखाली स्थानिकांवर अन्याय

वन विभागाविरोधात वाशी ग्रामस्थ आक्रमक; भाजप नेते दशरथ भगत यांचा आंदोलनाचा इशारा

नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार

कांदळवन संरक्षणच्या नावाखाली गाव आणि शहरी विकास योजनेतील नागरिकांचे पारंपरिक हक्कापासून त्यांना वंचित ठेवण्याचे प्रयत्न वन विभागाकडुन केला जात आहे. त्याविरुद्ध, सनदशीर मार्गाने आंदोलन करणार असल्याचे नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे संस्थापक तसेच पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते भाजपचे नेते दशरथ भगत यांनी सांगितले. समुद्र आणि खाडी किनार्‍यालगत असलेल्या कांदळवन संरक्षण करण्यासाठी वन विभागाने वन हक्क कायद्यात बदल केले आहेत. वन क्षेत्र निर्माण करण्यासाठी वनहक्क कायद्यात सन-2006 सुधारणा करण्यात आली आहे. कायद्यातील कलम-2(ग) व 3(2) नुसार वन क्षेत्र तयार करताना (घोषित) करण्यापूर्वी बाधित व आघात होणार्‍या गाव आणि शहरातील नागरिकांच्या हरकती, सूचनांसोबत, दवंडी, भीतीपत्रक, स्थानिक वत्तपत्रात जाहिरात, ग्रामसभा घेणे आवश्यक आहे. वनहक्क कायद्यातील नियमांचे उल्लंघन करून, वन विभागाने वाशी गावाच्या   खाडीलगत असलेल्या सीमाकन बंदीस्त करण्यासाठी भिंत उभारण्याचे काम सुरू केले होते. सागरी व खाडी किनार्‍यावर भिंत उभारून आपले पारंपरिक हक्क कमी करण्याचा प्रयत्न वन विभाग करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर दशरथ भगत यांनी वाशीच्या गावकर्‍यांच्या सहकार्याने वन विभागाचे भिंत उभारण्याचे सुरू असलेले काम बंद केले. नवी मुंबई शहराच्या निर्मितीसाठी शासनाने वाशी गावसह बेलापुर पट्टीतील स्थानिक नागरिकांच्या शंभर टक्के जमिनी हस्तांतरण केल्या, शहर निर्माण करतांना मुळ गावाचा गावठाण विस्तार करण्यासाठी सिडको आणि राज्य शासनाने कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे, नैसर्गिक कुटूंबाची वाढ, गरजा, सामाजिक कार्यासाठी भूखंड, उद्यान, मैदान, शाळा, रुग्णालय आणि पारंपरिक मच्छीमारी व्यवसाय यासाठी जागा उपलब्ध नाही. भविष्यात गावांची वाढ ही खाडीच्या दिशेने होणार असल्याने, वन विभागाने खाडी किनार्‍याची हद्द निश्चित करून, भिंत उभारण्याच्या कामाला सुरुवात करून, स्थानिक गावकर्‍यांना आपल्या पारंपरिक हक्कपासून वंचित ठेवण्याचे प्रयत्न सुरू केल्याने वन विभागाच्या निर्णयाला सनदशीर पद्धतीने विरोध करण्यासाठी तसेच गावकर्‍यांच्या मागण्यांसाठी चर्चा करण्यासाठी, सोमवारी वाशी गाव ग्रामसभेचे आयोजन माजी नगरसेविका फसीबाई भगत यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या वेळी राजाराम पाटील म्हणाले की, मुंबईतील कोळीवाडे आणि त्याठिकाणी राहत असलेले नागरिकांचे पारंपरिक हक्क मिळवून घेण्यासाठी लढा उभारला होता. त्याचपद्धतीने वाशी गावातील ग्रामस्थांनीदेखील एकजूट होऊन, आपल्या हक्कासाठी पुढे आले पाहिजे. कांदळवनची लागवड केली जात नाही ते समुद्राच्या पाण्यातुन नैसर्गिकरित्या निर्माण होते. त्याचे जतन कसे करायचे हे फक्त स्थानिक मच्छीमारी नागरिक व ग्रामस्थांनाच माहित आहे. मुंबई सी-लिंक, न्हावा-शेवा शिवडी पुल तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याच्या कामांसाठी कांदळवन नष्ट करण्यात आले आहेत. वन विभागाचे अधिकारी कांदळवनचे पुन्हा लागवड करण्यात येईल असे सांगण्यात येते, मात्र त्याची लागवड केली जात नाही ते नैसर्गिक निर्माण होतात, असे सांगत वन विभागाच्या अधिकार्‍यांचे अज्ञान राजाराम पाटील यांनी उघड केले. या वेळी, गाव कमिटीच्या माध्यमातून बैठका घेण्यात येतील त्यात पुढील आंदोलनाच्या दिशेबाबत चर्चा करण्यात येईल. यासाठी, वाशी गाव स्वराज्य ग्रामपंचायत समितीची स्थापनेची घोषणादेखील दशरथ भगत यांनी केली. या वेळी, वन विभागाच्या वतीने सुरू असलेले भित उभारण्याचे काम त्वरित रद्द करा, वनीकरण, औद्योगीकरण आणि शहरीकरण करताना बाधित झालेल्या नागरिकांच्या पारंपरिक हक्क संरक्षणासाठी वाशी गाव ग्रामस्वराज्य समितीची स्थापना, आदी 18 मागण्या उपस्थित ग्रामस्थांची हाथ उंचावुन मंजुरी देण्यात आली. या कांदळवन संरक्षक भिंतीच्या विरोधातील आयोजित ग्रामसभेस दशरथ भगत, ओबीसी नेते राजाराम पाटील, लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय नामकरण कृती समितीचे दिपक ह. पाटील, सुनील तु. पाटील, माजी नगरसेविका वैजयंती दशरथ भगत, युवा नेते निशांत भगत, शैलेश घाग, प्रकाश पाटील, मुंबईतील ट्रॉम्बे गाव ग्रामस्थ कमिटीचे रमाकांत कोळी व वाशीगावातील ज्येष्ठ ग्रामस्थ, वारकरी, मच्छीमार महिला भगिनी, विविध मंडळांचे पदाधिकारी व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

सिडको घेराव आंदोलनाची पूर्वतयारी

वनहक्क कायद्यातील अधिनियमांना हरताळ फासत वन विभागाने संरक्षण भित उभारण्याचा घेतलेल्या निर्णयाला सनदशीर मार्गाने विरोध करून वन विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यात पोलीस ठाण्यात चर्चा करावी, असे आवाहन दशरथ भगत यांनी या वेळी केले. यासोबतच पोलीस हे नागरिकांच्या रक्षणासाठी आहेत त्यांना पुढे करून, आंदोलकांवर लाठीचार्ज करून, गुन्हे दाखल करण्याचे मनसुबे वन विभागाच्या अधिकार्‍याचे असल्याचे सांगत आंदोलन चिरडण्याचे प्रयत्न वन विभागाचे असतील. यात आंदोलकांवर गुन्हे दाखल आणि पोलिसांची चौकशी असे वन विभागाच्या अधिकार्‍याचे प्रयत्न कदापी सहन करणार नाही. असा सज्जड दम देत, येत्या 24 जून रोजी लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी होणार्‍या सिडको घेराव आंदोलनाची पूर्वतयारी असल्याचे दशरथ भगत यांनी सांगितले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply