Breaking News

नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांना जीवन विमा सुरक्षा कवच द्या!

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी  

पनवेल ः प्रतिनिधी
कोरोनाच्या संकटकाळातही सर्वसामान्यांच्या सेवेसाठी नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी-कर्मचारी सदैव कार्यरत आहेत. शासनाला महसूल मिळवून देण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी-कर्मचारी कार्यालयामध्ये 100 टक्के उपस्थित राहून कर्तव्य बजावत आहेत. त्या अनुषंगाने कोविड योद्ध्यांप्रमाणे नोंदणी व मुद्रांक विभागातील सर्व अधिकारी-कर्मचार्‍यांना जीवन विमा सुरक्षा कवच मिळावे, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, राज्यामध्ये नोंदणी व मुद्रांक विभाग हे क्रमांक दोनचे महसूल मिळवून देणारे विभाग आहेत. कोविड महामारीच्या परिस्थितीमध्ये दुसर्‍या-तिसर्‍या लॉकडाऊनपासून नोंदणी विभागातील सर्व कार्यालयांत दस्त नोंदणीचे काम सुरू करण्यात आले आहे. सर्व अधिकारी-कर्मचारी जीवाची पर्वा न करता शंभर टक्के योगदान देत आहेत. नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी-कर्मचारी दररोज शेकडो व्यक्तींच्या संपर्कात येऊन दस्तऐवज़ हाताळत आहेत. त्यामुळे काही कर्मचार्‍यांना कोविडची लागण झाली असून काहींचा मृत्यूही झाला आहे. बरेच अधिकारी-कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबांना कोविडची लागण झाली आहे. केवळ कार्यालयीन कामकाज करताना व शासनाचा महसूल गोळा करताना त्यांना कोविडची लागण झाली आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
आरोग्य सेवकांनंतर या विभागातील कर्मचारी जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात येत असतात. अपुरे मनुष्यबळ व पुरेशा सुविधांअभावी त्यांच्यावर नियंत्रण आणणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत कर्मचार्‍यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. नोंदणी व मुद्रांक विभागातील सर्व अधिकारी-कर्मचार्‍यांनी 1800 कोटी रुपयांचा महसूल शासनास मिळवून दिला आहे. ते सर्व जण महसूल जमा करण्यासाठी कार्यालयामध्ये 100 टक्के उपस्थित राहून कार्यरत आहेत, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले आहे.  
त्यामुळे ज्याप्रमाणे कोविड योद्धांसाठी 50 लाखांचे विमा कवच देण्यात आले, त्याच धर्तीवर नोंदणी व मुद्रांक विभागातील कर्मचार्‍यांचा समावेश करण्यात यावा, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेल्या मागणीत अधोरेखित केले आहे. या संदर्भात त्यांनी राज्याचे महसूलमंत्री, महसूल नोंदणी व मुद्रांक अप्पर मुख्य सचिव आणि नोंदणी महानिरीक्षक तसेच मुद्रांक नियंत्रकांनाही माहितीस्तव प्रत दिली आहे.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply