पहिले भारतीय चित्रकार
कर्जत : प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार पराग बोरसे (कर्जत) यांची न्यूयॉर्कमधील पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका या आंतरराष्ट्रीय कला संस्थेकडून ’सिग्नेचर मेंबर’ म्हणून निवड करण्यात आली आहे. हा सन्मान मिळवणारे पराग बोरसे हे एकमेव भारतीय चित्रकार ठरले आहेत.
पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेची स्थापना फ्लोरा बी गिफुनी यांनी 1972 मध्ये केली. ही संस्था अमेरिकेतील सर्वात जुनी पेस्टल सोसायटी आहे. अमेरिकन कलेत ही संस्था सध्याच्या पेस्टलच्या पुनर्जागरणासाठी कार्यरत आहे. न्यूयॉर्कमधील नॅशनल आर्ट्स क्लबमध्ये या सोसायटीचे वार्षिक प्रदर्शन जगभरातील पेस्टल कलाकारांसाठी प्रमुख आकर्षण असते.
चीनमध्ये झालेल्या चित्र प्रदर्शनांत जगातील नामांकित 50 चित्रकारांची चित्रे मांडण्यात आली होती. त्यात कर्जत येथील पराग बोरसे यांच्या एका चित्राचा समावेश होता. बोरसे यांच्या याच चित्राला यापूर्वीही पेस्टल जरनल अमेरिकेच्या मॅगझीनने व्यक्तिचित्रणासाठीचा पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. त्यांच्या चित्रांना परदेशातील अनेक पुरस्कार मिळाले आहेत.