भाजपच्या पाठपुराव्याला यश
खोपोली ः प्रतिनिधी
नवी मुंबईत विद्यार्थी महाविद्यालयात तसेच कामानिमित्त नोकरदार प्रवाशांना दररोज सकाळी नवी मुंबई महापालिकेची पहिली बस 7.20 वाजता असल्यामुळे पुढे पोहचण्यास विलंब होतो. त्यामुळे सकाळी 6 वाजता पहिली बस सुरू करण्याचे निवेदनपत्र खोपोली भाजपने आमदार गणेश नाईक, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांना दिले. एनएमटी विभागाने तातडीने हिरवा कंदिल दाखवला आहे, परंतु रात्री वस्तीला येणार्या बसला खोपोली सिटी बसस्थानकात जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केल्यावर मुख्याधिकारी गणेश शेटे, नगराध्यक्ष सुमन औसरमल यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली आहे.
पनवेल, नवी मुंबई महानगरात मेडिकल, अभियांत्रिकी, विविध शाखांचे कॉलेज, हॉस्पिटल तसेच कामानिमित्त महिला, नोकरदार जातात. नवी मुंबईची बससेवा सुरू झाल्यामुळे रोजचा प्रवास करणे सोपे झाले आहे. वाशी-खोपोली पहिली बस 7.20 वाजल्यापासून सुरू होत असल्याने पुढे पोहचताना उशीर होतो. त्यामुळे विद्यार्थी, नोकरदारांना सकाळी 8च्या आत पोहचण्यासाठी खासगी वाहनांनी जावे लागते, तसेच आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
ही समस्या लक्षात घेऊन भाजपचे शहर सरचिटणीस इश्वर शिंपी यांनी आमदार गणेश नाईक, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्याकडे निवेदनपत्र दिले होते. एनएमटी आगाराचे प्रमुख अधिकारी शिंदे यांनी बससेवा सुरू करण्याचे मान्य केले असून रात्री वस्तीला येणार्या बससाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली असता भाजप पदाधिकार्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शेटे, नगराध्यक्ष सुमन औसरमल यांना निवेदन देत बससाठी जागा देण्यासाठीची मागणी केली आहे.
विद्यार्थी, नोकरदार प्रवाशांसाठी सकाळची बस सुरू होत असल्याचे स्वागतार्ह आहे, परंतु जागेसंबंधीचा निर्णय पालिकेच्या सभेत घेऊन बससेवा सुरू करण्यासाठी मदत करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी दिली.
RamPrahar – The Panvel Daily Paper