नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार
शिरवणे गाव, नेरूळ सेक्टर 1, जुईनगर परिसरातील वाढत्या चोरीच्या घटना, वाढत असलेले अनुचित प्रकार यामुळे नागरिकांमध्ये वाढलेली असुरक्षिता आदींबाबत नेरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्याम शिंदे यांची माजी नगरसेविका माधुरी सुतार यांनी भेट घेतली. भाजप प्रभाग 32 मधील कार्यकर्त्यांसमवेत एक लेखी निवेदन देऊन पोलीस गस्त वाढवावी, तसेच पोलीस बिट चौकी विभागात उभारण्याची मागणी निवेदनाद्वारे या वेळी करण्यात आली. निवेदनात शिरवणे नेरूळ सेक्टर1 आणि जुईनगर परिसरात वाढत्या चोरीच्या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. मागील 15 दिवसांपूर्वी शिरवणे टिम्बर मार्ट परिसरातील महाराष्ट्रभूषण स्वर्गीय नानासाहेब धर्माधिकारी बहुउद्देश्यीय इमारतमधील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात चोरी झाली होती. या परिसरात सातत्याने लहान मोठ्या चोरीच्या घटना सतत घडत असतात. या वाढत्या चोरीच्या घटनांमुळे महिला, लहान मुले व जेष्ठ नागरिक यांच्या मध्ये भीतीचे वातावरण पसरले असून असल्याचे निवेदनात माधुरी सुतार यांनी नमूद केले आहे. शिरवणे गाव व गावठाण परिसरात गर्दुल्ले, नशापान करणारे, टवाळखोर यांचे प्रमाण वाढले आहे. या घटकांपासून सार्वजनिक ठिकाणी टिंगलटवाळी, महिलांची आणि मुलांची छेडछाड करणे असे प्रकार घडत असतात. अशा असामाजिक तत्वापासून कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात पोलिस गस्त पथक वाढवावे जेणेकरून महिला व मुलींना रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे असुरक्षित वाटणार नाही. तसेच शिरवणे गावातील जूना ठाणे बेलापुर रोड, शिवाजी चौक, टिम्बर मार्ट परिसरात पोलीस बिट चौकी उभारावीत अशी मागणी निवेदनात केली आहे. या वेळी माधुरी सुतार यांच्यासमवेत विजय भरत नाईक, संजय झनझणे, प्रभाकर ठाकूर, पांडुरंग सुतार, अनिता पाटील आदी उपस्थित होते.
नवी मुंबई पोलीस आयुक्तातर्गत 112 क्रमांकाचा हेल्पलाइन नंबरवर नागरिकांनी मदत मागितली की, तात्काळ मदत मिळते. नेरूळ पोलीस ठाणे अंतर्गत येणार्या परिसरात चार बिट मार्शल तैनात आहे. एक स्वतंत्र पोलीस वाहन पेट्रोलियम करीत असते. यापुढे गस्ती पथक वाढवण्यात येईल. नव्याने बिट चौकी निर्माण करण्याचा निर्णय घेतला जाईल.
-श्याम शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नेरूळ पोलीस ठाणे