Breaking News

ज्येष्ठ नागरिकांची परवड; एसटी प्रवासातील सवलत मिळणे अवघड

पनवेल : प्रतिनिधी

आधारकार्ड हा अधिकृत वयाचा पुरावा एसटीला मान्य नसल्याने आणि ट्रायमॅक्स कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे ज्येष्ठ नागरिकांना एकादशीला पंढरपूरला जाण्यासाठी आणि गणेशोत्सवाला कोकणात जाताना एसटीमध्ये सवलत मिळणे अवघड होणार आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना एसटीमध्ये सवलतीसाठी 1 जुलैपासून स्मार्ट कार्ड आवश्यक केले आहे. याशिवाय या कार्डाचे  दर वर्षी नूतनीकरण करावयाचे आहे, पण हे कार्ड मिळण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि एसटी कर्मचार्‍यांचे वाद होत आहेत. यामुळे काही अघटित घडल्यास त्याची जबाबदारी एसटी महामंडळ घेणार आहे का? असा प्रश्न अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सचिव साहेबराव जाधव यांनी विचारला आहे. एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना एसटीमध्ये सवलतीसाठी स्मार्ट कार्ड 30 जून पूर्वी काढणे सक्तीचे केल्याने अनेकांनी एसटी आगारात गर्दी केली आहे. या कार्डसाठी देशात युनिक आयडी असलेले आधारकार्ड सोबतच पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स व निवडणूक ओळखपत्र यापैकी एक सक्तीचे केले आहे. सध्या एसटीत सवलत घेताना या पैकी कोणतेही एक ओळखपत्र चालत असल्याने स्मार्ट कार्डसाठी खेड्यापाड्यातून अनेक जण आधारकार्ड घेऊन येतात. त्यावेळी त्यांना वरील तीन पैकी आणखी एक ओळखपत्र मागितले जात असल्याने वाद होत आहेत. स्मार्ट कार्ड बनवण्याचे काम ट्रायमॅक्स कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने सिस्टिममध्येच दोन ओळखपत्रांचे नंबर टाकणे आवश्यक केल्याने आधारकार्ड असले तरी तो फॉर्म भरता येत नाही. त्यामुळे अनेकांना परत जावे लागत आहे. ट्रायमॅक्स कंपनीकडून कार्ड येण्यासाठी अडीच ते तीन महिन्याचा कालावधी लागतो म्हणजे तो पर्यंत सवलत मिळणार नाही.

आधार कार्ड असले तरी सिस्टिम दुसरे कार्ड असल्याशिवाय अर्ज स्वीकारत नाही. त्यामुळे आमच्या कर्मचार्‍यांना ज्येष्ठ नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्याबाबत रोज तक्रारी येत आहेत. आम्ही आमच्याकडे आलेल्या स्मार्ट कार्डचे नंबर बोर्डावर लिहून ठेवतो आपली पावती दाखवून त्यांनी ते घेऊन जायचे आहे.

-विलास गावडे, पनवेल आगार प्रमुख

मला कोल्हापूरला सांगण्यात आले की  स्मार्ट कार्डची पावती दाखवून तुम्हाला सवलत मिळेल पण येथे सूचना लावली आहे की 1 जुलै पासून स्मार्ट कार्ड शिवाय सवलत मिळणार नाही. तुम्ही आमच्याकडून त्यासाठी 51 रुपये फी घेता तर स्मार्ट कार्ड लवकर देणे गरजेचे आहे.

-अशोक कांबळे, निवृत्त पोलीस

आधार कार्ड हे युनिक ओळखपत्र आहे. त्यावरील जन्म तारीख सगळीकडे अधिकृत धरली जात असताना स्मार्ट कार्डसाठी  आणखी पुरावे कशाला मागितले जात आहेत. निवडणूक मतदानाचे वेळी ही निवडणूक ओळखपत्र नसले तर आधारकार्ड चालते. मग एसटी महामंडळाला का चालत नाहीत. गरीबांना या सवलती पासून वंचित ठेवण्याचा हा प्रयत्न  दिसत आहे.

-निलाक्षी थळी, सामाजिक कार्यकर्त्या

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply