पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि पनवेल महापालिकेचे नगरसेवक यांच्या सातत्यापुर्ण प्रयत्नांमुळे व केलेल्या पाठपुराव्यामुळे अनेक विकासाची कामे महापालिका क्षेत्रात होत आहेत. त्या अनुषंगाने पनवेल महापालिकेमार्फत मान्सूनपूर्व कामे वेगाने सुरू आहेत. यामधील काही कामे पूर्ण झाली असून काही कामे अंतिम टप्प्यात आहेत. अशी कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सुचना केल्या आहेत. पनवेल महापालिका हद्दीतील मान्सूनपूर्व कामांची पाहणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शनिवारी (दि. 25) केली. गावदेवी मंदिर, कन्या शाळा, टपाल नाका, मार्केट यार्ड जवळील मैदान या भागातील नाले सफाई, रस्ते आणि गटारांची, लोकनेते दि. बा. पाटील शाळा बांधकाम, कल्पतरू सोसायटीनजीकचे राजीव गांधी उद्यान सुशोभिकरण अशा विविध ठिकाणांच्या कामांचा पाहणी दौरा करण्यात आला. या वेळी संबंधित अधिकार्यांना कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देत परेश ठाकूर यांनी कामांमधील अडचणी जाणून घेतल्या. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर म्हणाले की, कल्पतरूनजीकच्या राजीव गांधी उद्यानामध्ये मोठी दुरवस्था झाली होती. परिसरातील नागरिकांनी व या उद्यानामध्ये येणार्या नागरिकांनी माझ्याकडे या उद्यानाची डागडुजी करण्यासंदर्भात मागणी केली होती. त्यानुसार उद्यानातील शौचालय, खेळणी यासह विविध साहित्यांची डागडुजी पनवेल महापालिकेतर्फे करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. लोकनेते दि. बा. पाटील शाळेचे बांधकामही आता अंतिम टप्प्यात आले आहे. बांधकामांतील किरकोळ कामेदेखील दोन-चार दिवसांत होणार असल्याचे कंत्राटदारांकडून समजले असल्याने या शाळेचा नामकरण सोहळा लवकरच करण्यात येणार आहे. पाहणीच्या वेळी नगरसेवक अनिल भगत, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, प्रभाग क्रमांक 18 विभागीय अध्यक्ष पवन सोनी, सपना पाटील, कार्यकारी अभियंता संजय कटेकर आदी उपस्थित होते.