धाटाव क्षेत्रात 40 ते 50 टक्क्यांच्या क्षमतेने कारखाने सुरु शासनाने लघु, मध्यम उद्योगांना सावरण्याची गरज
रोहा : प्रतिनिधी
रशिया युक्रेन युद्धाचे सावट, सर्वात मोठी बाजारपेठ व कच्च्या मालाचे निर्यातदार असलेल्या चीनवर आलेले मंदीचे सावट तर दुसरीकडे जागतिक बाजारपेठेत उत्पादित मालाला भाव नाही असे असताना कच्च्या मालाचे मात्र भाव वाढल्याने त्याचा परिणाम थेट उद्योगावर होताना दिसत आहे. देशातील लघु व मध्यम रासायनिक सह अन्य कारखाने आज मंदीचा सावटाखाली दिसून येत आहेत.औद्योगिक क्षेत्रात आलेले मंदी याचा परिणाम धाटाव औद्योगिक क्षेत्रात सह सर्वच रासायनिक कारखान्यावर होताना दिसत आहेत.
धाटाव औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यासह सर्वच रासायनिक कारखाने आज 40 ते 50 टक्के क्षमतेने चालू असल्याचे दिसून येत आहे. यातील बहुतांशी अशा कारखान्यात 40 ते 50 टक्के उत्पादन चालू असून कारखान्यातील काही विभाग कारखानदार बंद ठेवत आहेत. तर काही कारखाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत छोटे रासायनिक व अन्य कारखान्यांना प्रतिकूल परिस्थितीतही सक्षमपणे उभे राहण्यासाठी शासनाने मदत केली पाहिजे. या कारखान्यांना उपयुक्त असे शासनाने धोरण आखण्याची गरज आहे.
रायगड जिल्ह्यात रोहा धाटाव, महाड बिरवाडी, तळोजा, रसायनी, पाली सुधागड, खोपोली येथे मोठ्या प्रमाणात रासायनिक कारखाने आहेत. विशेषता रायगड जिल्ह्यातील सर्वात जुनी अशी ओळख असलेल्या धाटाव औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रासायनिक कच्चा व पक्का माल उत्पादित करणारे कारखाने आहेत. या कारखान्यातून औषधासाठी लागणारे रसायन, रंगद्रव्य, रबर यास अन्य रासायनिक उत्पादन या कारखान्यातून काढले जाते.
या कारखान्यातून निघालेल्या उत्पादनाला देशांतर्गत सह युरोप, अमेरिका, चीन या देशात उत्पादन विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध असते.परंतु मोठ्या प्रमाणात असलेली ही बाजारपेठ आज विविध कारणास्तव उपलब्ध होताना दिसत नाही. त्यामुळे जास्त निर्यात क्षमता असतानाही आज निर्यात थंडावले असल्याने मालाला उठाव नाही. महत्त्वाचे बाजारपेठ असलेले चीन सुद्धा आज मंदीच्या गर्तेत असल्याने मिळणारा कच्चा माल यावर परिणाम झाला आहे. परंतु यापुढेही जाऊन कच्चामाल मिळेल याची शाश्वती सुद्धा आता राहिली नाही. कोविड काळापासून कच्च्या मालाचा पुरवठा कमी होताना दिसत आहे.कच्चामाल पुरवठा होत नाही. त्याचबरोबर या कच्च्या मालाचे आज किमती वाढल्या आहेत. परदेशात बाजारपेठ उपलब्ध नाही परंतु देशांतर्गत मालही उठाव नसल्याने याचा थेट परिणाम जिल्ह्यातील रासायनिक कारखान्यावर होत आहे.आज धाटाव औद्योगिक क्षेत्रातील काही कारखाने वगळल्यास बहुतांशी कारखाने हे 40 ते 50 टक्के क्षमतेने चालू आहेत.
मालाला उठाव नसल्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे युक्रेन रशिया युद्ध चालू असल्याने अमेरिका व युरोप बाजारपेठ उत्पादित मालाला मिळत नाही. तर दुसरीकडे चीन मंदीच्या गर्तेत असल्याने चीनकडून कच्चामाल मिळत नाही. मिळत असलेला कच्चामाल हा महाग आहे. महाग कच्चामाल मिळाला तरीसुद्धा उत्पादन केल्यानंतर कारखानदारांना बाजारपेठ उपलब्ध होत नाही. त्याचा थेट निर्यातीवर परिणाम झाल्याने उत्पादित मालाला मागणी खूपच कमी आहे. उत्पादित मालाला मागणी नसणारे कारखान्याची आर्थिक परिस्थिती बिकट होताना दिसत आहे. यामुळे वरील सर्व कारणाचा अभ्यास केल्यास संपूर्ण रोहा धाटाव औद्योगिक क्षेत्रात गेल्या पंचवीस वर्षात असा मंदीचा अनुभव आला नव्हता अशी मंदी आज अनुभवायला मिळत असल्याचे कारखानदार सांगत आहेत.
कारखानदारांना पोत्साहनाची गरज
देशातील रोजगार मध्यम व लघु क्षेत्राकडे जास्त आहे जवळजवळ 72 टक्के रोजगार मध्यम व लघु क्षेत्रात आहे.त्यामुळे हा क्षेत्र वाचवण्याची गरज आहे. यासाठी छोट्या रासायनिक कारखान्यांना दिलेले बँकेने कर्ज यावर सवलतीची गरज आहे. शासनाच्या रासायनिक कारखान्यासाठी असलेल्या काही अटी शिथील करण्याची आवश्यकता आहे. दुसरीकडे या कारखानदारांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. तरच भविष्यात लघु व मध्यम उद्योग आपल्या पायावर स्थिरपणे उभे राहतील.
2022 वर्ष संपून 2023 या वर्षाला सुरुवात झाली आहे. सध्य परिस्थितीचा अनुभव घेतल्यास 2023 साल हे सुद्धा प्रचंड मंदीचे असणार असे औद्योगिक क्षेत्रातील जाणकार सांगत असल्यामुळे कारखानदारांचे 2023 मध्ये काय होणार याकडे डोळे लागले आहेत.आलेली मंदी पाहता निश्चितच त्याचा परिणाम नोकरावर सुद्धा होणार आहे.त्यामुळे शासनाने छोट्या रासायनिक कारखान्यांना मंदीच्या काळातही उभे राहण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची आवश्यकता आहे.
– पी. पी. बारदेशकर, रोहा इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष