पालीतील सामाजिक कार्यकर्त्या नंदिनी पालांडे यांचे तहसीलदारांना निवेदन
पाली : प्रतिनिधी
येथील शासकिय आदिवासी वसतिगृहातील मुलांना भोजन पुरविण्याचा ठेका शिखर स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेमार्फत सामाजिक कार्यकर्त्या नंदिनी पालांडे यांनी घेतला आहे. मात्र भोजन सेवा दिल्याची रक्कम या संस्थेकडून मिळत नसल्याची तक्रार नंदिनी पालांडे यांनी बुधवार (दि. 29) तहसीलदार दिलीप रायन्नावार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पालीमध्ये असलेल्या शासकिय आदिवासी वसतिगृहातील मुला, मुलींना भोजन पुविण्याचा ठेका सामाजिक कार्यकर्त्या नंदिनी पालांडे व त्यांच्या महिला सहकार्यांनी शिखर स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेमार्फत घेतला आहे. संस्थेच्या वतीने अशोक तांबे यांनी ठरवून दिल्याप्रमाणे 2700 रुपये प्रतिविद्यार्थी या प्रमाणे दर महिन्याला बील अदा करण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे 9 फेब्रुवारी 2022 पासून पालांडे यांनी मुली व मुले या दोन्ही वसतिगृहात नियमित भोजन पुरवठा केला. मात्र ठरल्याप्रमाणे रक्कम अदा झाली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
विशेष म्हणजे वसतिगृहाकडून शिखर स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेला 31 मार्च 2022 अखेरची रक्कम अदा करण्यात आली आहे, मात्र संस्थेने आम्हाला रक्कम अदा केली नाही, त्यामुळे अनेक अडचणी व समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे नंदिनी पालांडे यांनी या तक्रारीत नमुद केले आहे.
शिखर स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेचे पदाधिकारी थकीत रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असल्याने नंदिनी पालांडे व महिला सहकार्यांनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर होणार्या परिणामास संस्था जबाबदार असल्याचे नंदिनी पालांडे यांनी सांगितले.
शिखर स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेकडून नंदिनी पालांडे यांची थकीत बिले मिळावीत, यासाठी संस्थेच्या पदाधिकार्यांना दूरध्वनीवरून सूचना दिलेल्या आहेत. लवकरच बिलाची रक्कम अदा होईल, अशी अपेक्षा आहे.
-दिलीप रायन्नावार, तहसीलदार, पाली सुधागड