भाजपाचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला
मुंबई : प्रतिनिधी
गेली अडीच वर्ष ही अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार, अत्याचाराची गेली. राज्यात प्रशासन नावाची गोष्टच नव्हती. कोण कुणाचे ऐकत नव्हते. अनेक राजे काम करत होते. कोण राज्य चालवतंय तेच समजत नव्हते. सामान्य माणसाचं कुणी ऐकायला तयार नव्हते. शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहेत. छत्रपतींनी जो गनिमी कावा सांगितला, त्याच गनिमी काव्याने आणि छत्रपतींसारखे निधड्या छातीने महाराष्ट्रात हे सरकार पुन्हा एकदा आले असे भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी या वेळी सांगितले. तसेच त्यांनी या वेळी शिवसेना आणि उद्वव ठाकरे यांच्यावर टीका केली.
राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं आहे. आता नेमके काय आणि कसे घडलं? यावर राजकीय विश्लेषक खल करू लागले आहेत. विशेषत: 106 आमदारांचा पाठिंबा असूनही देवेंद्र फडणवीसांनी 40 आमदारांसोबत आलेल्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद देऊ केलं आणि स्वत: उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मंत्रीमंडळात जाणार नसल्याचे सांगूनही अर्ध्या तासात फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद कसं स्वीकारलं? असा प्रश्न उपस्थित केला जात असताना खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच त्याविषयीही खुलासा केला आहे. मी म्हटले होते की हे सरकार बनवेन, पण मी सरकारमध्ये जाणार नाही. तशी घोषणाही केली होती. पण घोषणा करून घरी गेलो आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांनी जाहीर करून टाकले की फडणवीसांनी सरकारमध्ये जावे. नड्डा, अमित शाह माझ्याशी बोलले. शेवटी मोदींशी संवाद केल्यानंतर पक्षाचा आदेश हाच
महत्त्वाचा आहे हे लक्षात घेऊन एकच निर्णय घेतला. काही लोक म्हणतात, हे सरकार 6 महिने चालेल. 2014चं सरकार आल्यानंतर तेव्हाही हेच म्हणायचे की वर्षभराच्या वर सरकार चालणार नाही. पण 40 वर्षांनंतर पहिल्यांदा 5 वर्ष पूर्ण करणारा हा देवेंद्र फडणवीस होता. 2014मध्ये महाराष्ट्रात पूर्ण बहुमताचे सरकार आणल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला आहे.