मुख्यमंत्री शिंदे समर्थक आ. संजय गायकवाड यांचा घणाघात
अकोला : प्रतिनिधी
खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादीची सुपारी घेऊन 100 टक्के शिवसेना संपवायला निघाले होते, असा घणाघाती मुख्यमंत्री शिंदे समर्थक बुलढाण्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी केला. बुलढाणा येथे परतल्यावर त्यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. चिडलेल्या आ.गायकवाड यांनी खा. संजय राऊत यांचा एकेरी शब्दात उल्लेख करत त्यांच्यावर जोरदार टीकेची तोफ डागली.
आमदार गायकवाड म्हणाले, संजय राऊत यांनी जर बाप काढला तर मलाही काढता येतो. ज्या 42 जणांनी त्यांना मतदान केले ते सर्व त्यांचे पण बाप आहेत. आधी खासदारकीचा राजीनामा द्या. मग आम्हाला सांगा. राष्ट्रपुरुष कुणाचा व्यक्तिगत नसतो, देशाचा असतो. आमच्या प्रत्येक फलकावर बाळासाहेबांचे छायाचित्र असणारच, असे त्यांनी स्पष्ट केले. जे जनतेतून निवडून येत नाही, त्याच चार पाच लोकांना तिकडे महत्व आहे. तेच चार पाच लोक उद्धव ठाकरेंकडे आहेत, असे ही गायकवाड म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यावरही शिवसेना उध्दव ठाकरे आणि शिवसेना कार्यकर्त्यांकडून आरोप सुरुच आहेत. शिंदे समर्थकांकडूनही त्याला तेवढेचे प्रतिउत्तर दिले जात आहे.