शॉर्टसर्किटमुळे कर्मचार्यांच्या जीवितास धोका
उरण : प्रतिनिधी
उरण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या इमारतीच्या छतातून पावसाचे पाणी झिरपत असल्याने भिंती ओल्या झाल्या असून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, संगणक यांना शॉक लागत आहे. त्यामुळे कार्यालयातील कर्मचारी आपला जीव मुठीत घेऊन काम करत आहेत. कार्यालयात एखादी दुर्दैवी घटना घडण्याची वाट न पाहता रायगड जिल्हा परिषदेने तत्काळ इमारतीची दुरुस्ती करण्याचे काम हाती घ्यावे अशी मागणी कर्मचारीवर्ग करीत आहेत. 2002 ते 2003 या वर्षात केंद्र व राज्य सरकारने सर्व शिक्षा अभियानांतर्गत पंचायत समितीच्या आवारात तालुका शिक्षण विभागासाठी स्वतंत्र इमारत बांधण्याचे काम हाती घेतले, परंतु अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षामुळे ठेकेदाराने निकृष्ठ दर्जाचे बांधकाम केले. त्यामुळे मागील काही वर्षांपासून या इमारतीच्या छताला पावसाळ्यात गळती लागली आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व संगणकाला हात लावला असता शॉक लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कर्मचारीवर्ग आपआपला जीव मुठीत घेऊन शासकीय कामकाज करीत आहेत.
शिक्षण विभाग उरण येथील इमारतीच्या छतातून पावसाचे पाणी कार्यालयात झिरपत आहे. त्यामुळे इमारतीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे, अशी मागणी आमच्या कार्यालयाकडून या अगोदर वरिष्ठांकडे करण्यात आली आहे.
-प्रियांका पाटील, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, उरण