Breaking News

पालीतील मुख्य जलवाहिनीला गळती

नगरपंचायतीचे दुर्लक्ष; हजारो लिटर पाण्याचा अपव्यय

सुधागड : रामप्रहर वृत्त
पालीकरांना पाणी पुरवठा करणार्‍या जॅकवेलजवळ असलेल्या मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागल्याने दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. या गळतीकडे पाली नगरपंचायत दुर्लक्ष करीत असल्याचे सध्या चित्र दिसत आहे. पालीकरांना अंबा नदीतून पाणीपुरवठा करण्यात येतो. अंबा नदीजवळील जॅकवेलमधून पंपांद्वारे पाणी सरसगडाच्या पायथ्याशी असलेल्या साठवण टाक्यांमध्ये सोडले जाते व तेथून पाली नगरपंचायत हद्दीत पाणीपुरवठा केला जातो. जॅकवेलजवळ मुख्य जलवाहिनीलाच गळती लागल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. सतत तक्रारी करूनदेखील उपाययोजना होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पाणीपुरवठा योजनेच्याच बाजूला अंबा नदीवर नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. हे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने सदर जलवाहिनीचे काम करण्यास अडथळा होत असल्याचे कारण दिले जाते, पण प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा भुर्दंड पालीकरांच्या माथी का? असाही सवाल जनतेकडून केला जात आहे. इतके होऊनही नगरपंचायत ही पाण्याची गळती थांबवणार की, बघ्याची भूमिका घेणार? असा सवाल विचारला जात आहे.

फुटलेली जलवाहिनी ताबडतोब दुरूस्ती करून लवकरच त्या पूर्ववत केल्या जातील, तसेच लवकरच नवीन जलवाहिनीचे कामही हाती घेण्यात येणार आहे.
-विद्या येरुणकर, मुख्याधिकारी, पाली नगरपंचायत

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply