मोहोपाडा : प्रतिनिधी
रसायनी पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पोलीस अधीक्षक रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली शपथ आणि दौड या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या जयंतीनिमित्त रसायनी पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील, पत्रकार आणि नागरिक यांना पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांनी शपथ दिली. देशाची अखंडता, एकता आणि सुरक्षा अबाधित ठेवण्याची तसेच त्यासाठी आपले योगदान देण्याची प्रत्येकाने शपथ घेतली. शपथ ग्रहणनंतर पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि पिल्लई महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी चार किलोमीटरची दौड रसायनी पोलीस ठाण्यातून निघाली. ही दौड सिध्देश्वरी कॉर्नर ते बॉम्बे डाईंग कंपनी तेथून रसायनी पोलिस ठाणे अशी चार किमी एकता दौड काढण्यात आली. यात पिल्लई कॉलेजचे साठ विद्यार्थी, रसायनी पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.