पनवेल : वार्ताहर
पनवेल भागात राहणार्या कामगाराच्या 11 वर्षीय मुलाचे अपहरण करून 30 हजार रुपयांच्या खंडणीची मागणी करणार्या सैबुद्दीन आलम (35) याला ठाण्यातील नारपोली पोलिसांनी भिवंडी येथून अटक केली आहे, तसेच त्याच्या ताब्यातून अपहृत मुलाची सुटका करून त्याला पालकांच्या स्वाधीन केले आहे. आरोपीला पुढील कारवाईसाठी पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अपहृत मुलाच्या पित्याने केलेल्या कामाचा मोबदला वेळेवर दिला नसल्याने आरोपीने हे कृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी सैबुद्दीन आलम तक्रारदारासोबत पनवेल भागात मिस्त्री काम करीत होता. सैबुद्दीन आलमने दहा दिवस काम केल्यानंतरदेखील तक्रारदाराने त्याला कामाचा मोबदला दिला नव्हता. त्यामुळे रागाच्या भरात त्याने तक्रारदाराच्या 11 वर्षीय मुलाला खाण्यास देण्याच्या बहाण्याने सोबत नेऊन त्याचे अपहरण केले होते. तक्रारदाराने सैबुद्दीनला मोबाईलवर संपर्क साधल्यानंतर त्याने 8 हजार रुपये दिल्यास त्याच्या मुलाला परत देणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे तक्रारदाराने त्याला 4 हजार रुपये पाठवून दिले, मात्र त्यानंतर सैबुद्दीन याने तक्रारदाराकडे आणखी 30 हजारांची मागणी केली, अन्यथा त्याच्या मुलाला मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तक्रारदाराने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाला या तपासात आरोपी नारपोलीस पोलीस ठाण्याच्या हद्दीत भिवंडी येथे असल्याची माहिती मिळाली. नारपोली पोलिसांनी त्याचा भिवंडी परिसरात शोध घेतला असता तो त्याच्या बहिणीच्या घरी अपहृत मुलासोबत असल्याचे समजले. पोलिसांनी आरोपी सैबुद्दीन आणि अपहृत मुलाला ताब्यात घेऊन दोघांना पनवेल शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. मुलाच्या कुटुंबियांनी पोलिसांचे आभार मानले.