मुंबई : प्रतिनिधी
मुंबई ड्रग्स केसप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासह भाजप नेते मोहीत कंबोज यांच्यावर आरोप केले होते. या विरोधात कंबोज यांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी करताना सोमवारी (दि. 8) कोर्टाने नवाब मलिक यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत प्रतिक्रिया देताना मोहीत कंबोज म्हणाले की, मलिक यांच्या विरोधात फौजदारी खटला दाखल करण्यासाठी याचिका दिली होती. त्यावर गेल्या आठवड्यात कोर्टाने म्हणणे ऐकून घेतले होते. त्यानंतर आज कोर्टाने त्याबाबतचे आदेश काढले आहेत. माझ्या विरोधात खोटे आरोप केल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसत असल्याचे कोर्टाने यात नमूद केले आहे, तसेच नबाव मलिक यांच्या विरोधात खटला चालवला पाहिजे, असे आदेशही कोर्टाने दिले आहेत. मी न्यायाधीशांचे आभार मानतो. सत्य हे त्रस्त होऊ शकते, मात्र पराभूत होऊ शकत नाही, असे मोहीत कंबोज यांनी म्हटले आहे.