Breaking News

नैसर्गिक नाल्याचा मार्ग बदलल्याने कडाव परिसरातील शेती पाण्याखाली

कर्जत : बातमीदार

तालुक्याच्या कड़ाव भागातील एका फार्महाऊस मालकाने मातीचा भराव करून नैसर्गिक नाल्याचा मार्ग बदलल्याने स्थानिकांच्या शेतात पाणी शिरले आहे. त्यामुळे शेतात उगवलेली भाताची रोपे कुजून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कर्जत तालुक्यातील कडाव परिसरातील सर्वे नंबर 83/2 या जमिनीत काही महिन्यांपुर्वी मातीचा भराव करण्यात आला आहे. हा भराव करताना जागा मालकाने परिसरातील शेतांतील पाणी वाहून जाणार्‍या नैसर्गिक मार्गावर लहान आकाराचे पाईप टाकले. त्यामुळे पावसाळ्यात भातशेतीचे नुकसान होईल, असे लेखी पत्र आजुबाजुच्या शेतकर्‍यांनी जानेवारी 2022 मध्ये कडाव ग्रामपंचायतीला दिले होते.

कडाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. पावसाचे पाणी वाहून नेणारा नैसर्गिक मार्ग बंद झाल्यामुळे सर्वे नंबर 83/2 परिसरातील शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे शेतात उगवलेली भाताची रोपे कुजून जाण्याची शक्यता आहे. तसेच पावसाच्या पाण्याबरोबर शेतांमध्ये चिखल, मातीसह वाळू वाहून आल्याने शेती नापीक होण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील शेतकरी चिंतातूर झाले आहेत.

जानेवारी महिन्यात सर्वे नंबर 83/2मध्ये मातीच्या भरावाचे काम सुरू होते, त्यावेळी त्या परिसरातील आम्ही सर्व शेतकर्‍यांनी लेखी पत्र देऊन कडाव ग्रामपंचायतीला त्याची माहिती दिली होती. परंतु, कडाव ग्रामपंचायतीने काहीच कारवाई न केल्यामुळे आमच्या सर्व शेतीचे नुकसान झाले आहे. तरी शासनाने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी.

-अजय हरिभाऊ गंगावणे, शेतकरी, कडाव, ता. कर्जत

मातीचा भराव करणार्‍या फार्महाऊस मालकाला आम्ही जानेवारी महिन्यातच नोटीस दिली होती. परंतु, त्यांनी काहीच कारवाई केली नसल्यामुळे आम्ही पुन्हा त्यांना नोटीस काढून कारवाई करु. तसेच सदर बाब तहसीलदार व प्रांत यांनादेखील कळवत आहोत.

-अशोक किसन पवार, सरपंच, ग्रामपंचायत-कडाव

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply